कडक उन्हाळा सुरू झाला आहे याची चर्चा घर, ऑफिस, लोकल, मध्ये सुरू झाली असली तरी उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी किंवा छत्री ओझं अनेकांना जड होत असत. त्याच प्रमाणे पिकांचा बचाव करण हा ही मोठा प्रश्न आहे, तर आपण या विषयाबद्दल माहिती जाणून घेऊ. कोणतही काम करण्यापुर्वी त्या गोष्टीची संपूर्ण माहिती आणि लागणार साहित्य उपलब्ध असल पाहिजे. उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये कोणत्या पिकांची लागवड करतात या गोष्टीची माहीती असन हे ही आवश्यक आहे.
महत्वाचा बाबी
माती परीक्षण करणे हे खूप महत्वाचे आहे. कारण जास्त उत्पादन मिळवायच असेल तर जमिनीच आरोग्य चांगल असण खूप महत्वाच आहे. जमिनीची सुपिकता टिकवण गरजेचं आहे.आजकाल शेतकरी जास्त उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर करतात. याचा अनिष्ट परिणाम मातीच्या सुपीकतेवर व पोतावर होतो. परिणामी उत्पादन कमी होते. माती परीक्षण म्हणजे नेमके काय तर आपल्या शेतातील प्रातिनिधिक नमुन्यांचे पृथक्करण करून त्यातील उपलब्ध मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून अहवालानुसार पिकाचे व खतांचे नियोजन करणे होय. माती परीक्षणामुळे जमिनीतील अन्नद्रव्याच प्रमाण, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, जमिनीचा कस यांचे निदान होते.
बऱ्याचदा शेतकरी माती परीक्षण न करता पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य जमिनीला असलेल्या गरजेपेक्षा मोठ्या प्रमाणावर देतात. याचा दुष्परिणाम पिकांच्या वाढीवर होतो, जमिनीची सुपीकता कमी होते व खर्चही वाढतो. माती परीक्षण केल्याने हे आपणास टाळता येईल. कारण माती परीक्षणामुळे जमिनीत किती अन्नद्रव्य आहे, कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमाण कमी आहे, कोणते अन्नद्रव्य जास्त आहे व यावरून कोणते खत वापरावे, किती वापरावे, कोणते पिक घ्यावे हि माहिती मातीपरीक्षण केल्याने समजते. म्हणुन पिक लागवडी आधी माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा शासकीय किंवा खाजगी प्रयोगशाळा, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यापीठ येथे करून घेण गरजेच असत.
पिक लागवड करण्यासाठी लागणार साहित्य
पिक लागवड करण्यापूर्वी लागणारे सर्व साहित्य जसे की बियाणे, रासायनिक खत, शेणखत, बुरशी व कीटकनाशके या सर्व गोष्टींची तयारी करून ठेवली पाहिजे. बियाणे परवानाधारक योग्य विक्रेत्याच्या दुकानातूनच खरेदी करावे. बियाण्यात सत्यप्रत, पप्रमाणित व पायाभूत असे तीन प्रकार असतात असेच बियाणे खरेदी करावे. भाजीपाला लागवडीसाठी गादीवाफे तयार करताना चांगले कुजलेले शेणखत वापरावे. शेणखत वापरताना त्यातसोबत ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यासारख्या जैविक घटकांचा वापर करावा.
कुजलेले शेणखतच जमिनीत मिसळावे. अर्धवट कुजलेले, ओले शेणखत जमिनीत मिसळल्यास ते कुजताना उष्णता निर्माण होते व त्याचा परिणाम शेतातील इतर महत्वाच्या सूक्ष्मकिडीवर व तसेच गांडुळांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जमिनीत शेणखत टाकताना ते कुजलेले आहे कि नाही याची खात्री करूनच ते टाकावे. शेणखतातून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैविक घटकांचा वापर शेणखड्ड्यात करावा. शेणकिड्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम ऍनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना यांसारख्या जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
अंतरमशागत
मे महिन्यामध्ये जमिनीची अंतरमशागत केल्याने सुप्त अवस्थेत असलेल्या किड्याची अंडी-कोष उघड्यावर येतात व किड्यांचा उन्हामुळे तापून ते नष्ट होतात.
विविध प्रकारची लागवड
साधारणत जून-जुलै महिन्यामध्ये फळझाडे लागवड करतात त्यासाठी 1 बाय 1 बाय 1 मीटर आकारचे खड्डे खोदावे व त्यांना उन्हामध्ये चांगल तापू द्यावे. डाळिंबाच्या झाडांना आवश्यक इतकेच पाणी दयावे , जेने करून पुढील बहार धरण्यास योग्य अवस्था प्राप्त होईल व रोगाचा प्रादुर्भाव ही कमी होईल. उन्हाळया मध्ये हळद, आले व सुरण या कंदवर्गीय पिकांची लागवड करण ही योग्य आहे. सेलम, कृष्ण, राजापुरी, कडप्पा या जातींची हळद तर माहीम जातीचे आले लावावे.
पाण्याचा योग्य वापर
आजही बरेच शेतकरी सर्रास मोकाट पाणी जमिनीस देतात त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. तर त्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब टाळावा व आधुनिक पद्धतीचा अवलंब करण गरजेच आहे. आजच्या युगात पाणी संबंधित प्रश्नांंसाठी नवीन पद्धती उप्लबध आहेत जस की ठीबक, स्प्रिंकलर यासारख्या पाणी वाचवण्याच्या आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पाण्याचा वापर योग्यप्रकारे होतो व पिकांना आवश्यक पाणी मिळते. तुषार सिंचन पद्धतीमुळे सिंचनाची कार्यक्षमता वाढते व पाण्याची बचत होते. तुषार सिंचन जास्तीत जास्त वापर गहू, भुईमूग, पालेभाज्या, फुले यांसाठी करावा. तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा अपव्यय टाळून, पिकांमध्ये सम पातळीत पाणी दिले जाते व तसेच काही ठिकाणी तुषार सिंचनामुळे उत्पादन वाढल्याचही दिसून आले आहे. या पद्धतीमुळे जमिनीची धूप ही थांबवली जाते.
ठिबक सिंचन या पद्धतीमध्ये जमिनीला पाणी न देता पिकांच्या मुळाशी पाणी दिले जाते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो. या पद्धतीमध्ये पाणी कमी वेगाने पिकाच्या मुळांना दिल्याने ते जिरते व पिकांची जोमदार वाढ होते परिणामी उत्पादनही मोठ्या प्रमाणावर मिळते तसेच या पद्धतीमुळे खतांवरील खर्च कमी होतो कारण या पद्धतीद्वारे दिलेल्या खतांचा 100% वापर होतो व 30 ते 35 % खतांची बचत ही होते. क्षारयुक्त, कोरडवाहू माळरानावरच्या व चढ उताराच्या जमीनी ही या पद्धतीद्वारे लागवडीखाली आणता येतील.
बाष्पीभवन नियंत्रण करण्यासाठी प्रक्रिया
बाष्पीभवनामुळे पाणी जमिनीतून व वनस्पतीच्या पानांवाटे खूप प्रमाणात जाते त्यामुळे पिकांना आवश्यक असणारे पाणी जमीनीतुन प्राप्त होत नाही. त्यासाठी गव्हाचा भुस्सा, भाताचा पेंढा, ऊसाचे पाचट, वाळलेल गवत, शेतातील काडी-कचरा किंवा पॉलिथिन पेपरचा वापर जमीन अच्छादनासाठी करावा. जमिनीतून होणारे बाष्पीभवन कमी करण्यास या आच्छादनाचा उपयोग होतो. या व्यतिरिक्त पिकांमधुन होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलिन सारख्या बाष्पविरोधक रसायनांची फवारणी करावी.
विविध प्रकाचे रसायनांची जसे की केओलिन, चुना, झिंक सल्फेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, एल्युमिनियम सिलिकेट फवारल्यास पानावर पांढरा थर जमा होतो त्यामुळे प्रकाशकिरणे परावर्तीत होत नाहीत आणि बाष्पीभावनाचे प्रमाण कमी होते. शेतातील बाष्पीभावन कमी करण्यासाठी जास्त लांबी-रुंदी असणारे शेततळे न बांधता जास्त खोली असणारे शेततळे बांधावे. हवेशी संपर्कात येणार पाण्याचा भाग वाढला की बाष्पीभावन जास्त होते त्यामुळे जास्त खोली असणारे शेततळे उपयोगी ठरते.
शेतीविषयक प्रतिपूर्ण माहिती मिळवण्यासाठीहिरा ऍग्रोच्या युट्युब चॅनेलला एकदा नक्की भेट द्या.
Leave a reply