“हिरा ठिबक सिंचन म्हणजे पिकाला हवे तेवढे, हवे तेव्हा, नियंत्रित पाणी देण्याची व्यवस्था.”
पिकास पाणी कधी? किती? आणि कसे? दयावयाचे हे ठरविणे म्हणजेच त्या पिकाचे पाणी व्यवस्थापन करणे होय.
1) सिंचनाची वेळ : (कधी?) जमिनीतील ओलावा (वापसा स्थितीपासून जमिनीतील मरणोक्त बिंदूपर्यंत) सर्वसाधारणपणे 50% कमी झाला की सिंचन पद्धतीने पाणी दयावे. परंतु जमिनीतील पाणी कमी होण्याची टक्केवारी विचारात घेऊन पिकानुसार नियोजन करणे फायदेशीर ठरते. उदा.- केळी, भाजीपाला, टोमॅटो इ. पिकांना जमिनीतील 25 ते 30% ओलावा कमी होताच पाणी देणे आवश्यक असते. तर ज्वारी, बाजरी इ. पिकांना जमिनीतील 60 ते 75% ओलावा कमी झाला तरी चालतो. त्यानुसार जमिनीतील ओलावा अपेक्षित पातळीपर्यंत खाली येताच पाणी दयावे. तसेच पिक आणि जमिनीतून दररोज होणारे बाष्पीभवन आणि पर्णोत्सरण यानुसारदेखील पाणी किती दिवसांनी दयावयाचे ते ठरविता येते.
2) सिंचनाची कार्यक्षमता : पिकांसाठी जमिनीतील दिलेले पाणी पिकांकडून वापरण्यासाठी जमिनीमध्ये योग्य प्रमाणात वितरीत करणे यास सिंचनाची कार्यक्षमता असे म्हणतात.
ही कार्यक्षमता पाण्याच्या ठिकाणापासून पिकांपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी,(वाहकता कार्यक्षमता) शेतामध्ये सुरवातीपासून शेवटपर्यंत एकसारखे पाणी देण्यासाठी,(पाणी देण्याची कार्यक्षमता) पाण्याचे वितरण समप्रमाणात करण्यासाठी,(वितरण कार्यक्षमता) आणि पर्यायाने पाण्याच्या प्रत्येक सेंटीमीटर खोलीसाठी येणाऱ्या उत्पादनात वाढ होण्यासाठी (जलवापर कार्यक्षमता) वाढविणे आवश्यक आहे.
3) सिंचन पाण्याची गरज (किती?) : पिकांना लागणारे पाण्याची गरज, पिकांना लागणारे एकूण पाणी व त्याची खोली, जमिनीचा प्रकार यावर सिंचन पाण्याची गरज ठरते.
जमिनीतील पाण्याच्या उपलब्ध ओलाव्यापैकी 50% पाणी कमी झाल्यावर निरनिराळ्या जमिनीत किती पाणी दयावे लागेल हे खालील काही गोष्टीचा अभ्यास करून ठरविले जाते.
– पिकाखालील किंवा झाडाखालील क्षेत्र
– त्यापैकी ओलीत करावयाचे क्षेत्र
– पिकाचा सह्गुणक
– संदर्भ पिक
– बाष्पपर्णोत्सरण
आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये खालील सूत्रानेसुधा पाण्याची गरज ठरविली जाते.
पाण्याची गरज ग = अ×ब×क×ड (लिटर/दिवस)
अ = बाष्पीभवन (मिलीमीटर/दिवस)
ब = बाष्पीभवन पात्र गुणोत्तर (0.7 ते 0.8)
क = पिकाचे एकूण क्षेत्र (चौ.मीटर)
ड = पिकाखालील क्षेत्र (पिक गुणांक)
(“ड” हा पिकाच्या सह्गुणक सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 0.7, जोमदार वाढीच्या अवस्थेत 0.8, पिकाच्या फुल व फळ धारणेच्या वेळी 1 आणि परीपक्वेतेच्या वेळी 0.8 असतो.)
Leave a reply