ठिबक सिंचनाचा प्राथमिक परिचय
प्रश्न : ठिबक सिंचन म्हणजे काय ?
उत्तर : पाणी आणि खते पिकांच्या मुळाच्या कार्यक्षम कक्षेत मोजून, मापून थेंबा- थेंबाने प्लास्टिकच्या नळ्या ( लॅटरल्स ) आणि ड्रिपर्स च्या सहाय्याने देण्याच्या पद्धतीस ठिबक सिंचन असे म्हणतात.
प्रश्न : ठिबक सिंचनाचा शोध कधी व कुठे लागला ?
उत्तर : इस्त्राईल देशातील शिमचा ब्लास या संशोधकानी १९६० मध्ये ठिबक सिंचन ह्या तंत्रज्ञानाचा शोध लावला.
प्रश्न : ठिबक सिंचन थोडक्यात कसे कार्य करते ?
उत्तर : विशीष्ट दबावाखाली पाणी तसेच खते थेंबा- थेंबाने पिकांच्या मुळाच्या कार्यक्षम कक्षेत ठराविक मापाने दिल्या जाते.
प्रश्न : ठिबक सिंचनासाठी पाण्याचा दबाव किती असावा लागतो ?
उत्तर : ठिबक सिंचनासाठी पाण्याचा दबाव १ ते १.५ kg/cm2 असावा लागतो.
प्रश्न : ठिबक सिंचनाचे मुख्य प्रकार किती व कोणते ?
उत्तर : ठिबक सिंचनाचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात १) इनलाईन ठिबक आणि २) ऑनलाईन ठिबक
प्रश्न : इनलाईन ठिबक म्हणजे काय व त्याचा वापर कुठल्या पिकांसाठी करायचा ?
उत्तर : ठिबक सिंचनात ड्रिपर्स द्वारे थेंब- थेंब पाणी झाडांच्या मुळाशी दिले जाते जेंव्हा हे ड्रिपर्स उपनळ्या (लॅटरल्स ) तयार करीत असतांना ठराविक अंतरावर लॅटरल्सच्या आत टाकलेले असतात तेंव्हा ठिबक सिंचनास इनलाईन ठिबक असे म्हणतात.
इनलाईन ठिबक चा वापर जी पिके एक ठराविक अंतरावर ओळ किंवा जोड ओळ पद्धतीने पेरली जातात त्यांच्या सिंचनासाठी होतो. उदा :- ऊस, कापूस, तेलबिया पिके, दाळवर्गीय पिके, भाजीपाला पिके, गहू,ज्वारी, मका इत्यादी
प्रश्न : इनलाईन ठिबक कोण – कोणत्या साईजमध्ये उपलब्ध असते व त्यातील ड्रिपर्स किती – किती अंतरावर उपलब्ध असतात ?
उत्तर : इनलाईन ठिबक मधील उपनळ्या (लॅटरल्स ) ह्या विविध व्यासात उपलब्ध असतात जसे कि – १२ मि.मी, १६ मि.मी व २० मि.मी.
इनलाईन ठिबकमध्ये ड्रिपर्स हे पिकांच्या रोपांमधील अंतरानुसार १, १.२५, १.५०, २.०, २.५ व ३.० फुटांवर आतून लावलेले असतात.
प्रश्न : इनलाईन ठिबक मधील ड्रिपर्स चा ताशी डिस्चार्ज किती असतो ?
उत्तर : तसे तर बाजारपेठेत २ ते ८ लिटर / तास डिस्चार्ज असणारे ठिबक उपलब्ध आहे परंतु शेतात वाफसा कंडीशन टिकण्यासाठी आणि जास्त पाण्यामुळे मातीची धूप होऊ नये म्हणून ताशी ४ लिटर डिस्चार्ज असणारी ठिबकच वापरलेली बरी.
प्रश्न : ऑनलाईन ठिबक सिंचन म्हणजे काय व त्याचा वापर कोणत्या पिकांसाठी होतो ?
उत्तर : जेंव्हा ठिबक सिंचनातील ड्रिपर्स हे झाडांमधील अंतरानुसार लॅटरल्सवर बाहेरून लावलेले असतात तेंव्हा ठिबक सिंचनास ऑनलाईन ठिबक सिंचन असे म्हणतात. अश्या प्रकारचे ठिबक मुख्यत्वे फळझाडे जसे कि – द्राक्षे, संत्रा, मोसंबी, डाळिंब, लिंबू, टरबूज, खरबूज, नारळ इत्यादी पिकांसाठी वापरतात.
प्रश्न : ऑनलाईन ठिबक मधील ड्रिपर्स चा ताशी डिस्चार्ज किती असतो ?
उत्तर : ऑनलाईन ठिबक मधील ड्रिपर्स चा ताशी डिस्चार्ज २ ते ८ लिटर / तास उपलब्ध असतो. आता – आता असे ड्रिपर हि उपलब्ध झाले आहे कि ज्यांचा डिस्चार्ज आपण हवा तसा कमी जास्त करू शकतो.
प्रश्न : आपण ठिबक नळ्या शेतात किती फुटापर्यंत अंथरू शकतो ?
उत्तर : ठिबक सिंचन हि पाण्याच्या दबावाखाली चालणारी यंत्रणा असल्याने साधारणतः आपण सबमेनच्या एका बाजूस १८० ते २२० फुटापर्यंत ठिबक नळ्यांचे जाळे शेतात अंथरू शकतो.
प्रश्न : ठिबक सिंचनामध्ये लॅटरल्स चा रंग काळाच का असतो ?
उत्तर : ठिबक सिंचनाच्या लॅटरल्स ह्या संपूर्ण शेतात अंथरलेल्या असतात तेंव्हा त्या उन्हाने खराब होऊ नये म्हणून त्यांना बनवितांना त्यामध्ये कार्बन ब्लॅक मिसळला जातो जो कि सूर्याच्या उन्हापासून नळ्यांचे संरक्षण करतो.
प्रश्न : सुक्ष्म सिंचनाद्वारे कोणत्या वेळेस पिकांना पाणी द्यावे?
उत्तर : दिवसा उन्हात पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते, तसेच वाऱ्याच्या वेगामुळे फवारा पद्धतीवर परिणाम होतो. यासाठी पाणी शक्यतो सूर्य उगवण्यापूर्वी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर देणे संयुक्तिक ठरेल.
प्रश्न : ठिबक पद्धतीत मनुष्यबळात किती बचत होते ?
उत्तर : ठिबक सिंचन पद्धतीत जमिनीची कमी मशागत करावी लागते. याशिवाय गवत व तण यांची मर्यादित वाढ होते. त्याकरिता करावी लागणारी मशागत देखील वाचते. तसेच पाणी व खते देण्यासाठी कमी मनुष्यबळ लागते. त्यामुळे ऐकूण २०-२५ टक्के कमी मनुष्यबळ लागते.
प्रश्न : दीर्घकाळ ठिबक सिंचनामुळे मुळांच्या सान्निध्यात क्षारांचे प्रमाण वाढते. पिकावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो का ?
उत्तर : ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास क्षारांचे प्रमाण ठराविक क्षेत्रात वाढते. हे क्षार मुळांच्या कार्यक्षेत्राबाहेर वाढतात. त्यामुळे अनिष्ट परिणाम होत नाहीत.
प्रश्न : ठिबक सिंचन पद्धतीच्या अर्थशास्त्रावर परिणाम करणारा महत्वाचा घटक कोणता?
उत्तर : उपनऴ्या (लॅटरल्स) आणि तोट्या (ड्रीपर्स) मधील अंतराचा परिणाम इतर घटकांपेक्षा जास्त होतो. दोन उपनऴ्यांमधील जर फार कंमी असेल, तर ऐकूण क्षेत्रासाठी लागणाऱ्या उपनऴ्यांची संख्या वाढून खर्च वाढतो. जर हे अंतर खूप जास्त असेल, तर पिकांना व्यवस्थित पाणी न मिळाल्याने उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे उपनऴ्यांमधील अंतर आवश्यक तेवढे ठेवावे.
प्रश्न : ठिबक सिंचन पद्धतीमुळे रोग व किडींचे प्रमाण कमी होते का?
उत्तर : ठिबक सिंचन पद्धतीत रोपांची व झाडांची वाढ निरोगी असल्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होऊन पिकांच्या संरक्षणासाठी होणाऱ्या खर्चात बचत होते.शिवाय पाण्याद्वारे पसरणारे रोग टाळले जातात किंवा कमी प्रमाणात होतात.
प्रश्न : ठिबक सिंचनाच्या वापराने तणांच्या वाढीवर काय परिणाम होतो ?
उत्तर : ठिबक सिंचन पद्धतीत प्रत्यक्ष पिकांच्या मुळांजवळ अपेक्षित क्षेत्रावर पाणी दिले जाते. न भिजलेल्या क्षेत्रावर तणांची तीव्रता कमी असते. परिणामी जमिनीतील तण नियंत्रणाचा खर्च त्याप्रमाणात कमी होतो. शिवाय तणांचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुख्य पिकांना जमिनीतील अन्नद्रव्यांचा चांगला उपयोग करून घेता येतो.
प्रश्न : ठिबक सिंचन पद्धतीत रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेत वाढ होते का ?
उत्तर : ठिबक पद्धतीत मुख्य मूलद्रव्ये असलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते. पिकांना समप्रमाणात खते देता येतात. पाणी मर्यादित स्वरुपात दिल्यामुळे, खते मुळांच्या कार्यक्षम कक्षेत राहिल्यामुळे खतांचा उपयोग कार्यक्षमरित्या होतो.
प्रश्न : ठिबक सिंचन पद्धतीत रानबांधणी व लागवड पद्धतीत बदल करावे लागतात का?
उत्तर : ठिबक सिंचन पद्धतीत जमिनीची रानबांधणी करण्याची जरुरी भासत नाही. चढ उतार लक्षात घेऊनच ठिबकची रचना करता येते. ठिबकचा वापर करताना लागवडीमध्ये बदल करावे लागतात. त्यामुळे मशागत करणे सोयीस्कर होते.
प्रश्न : ठिबक सिंचनाचे मुख्य फायदे कोणते आहेत ?
उत्तर : ठिबक सिंचनाचे मुख्य फायदे खालील प्रमाणे आहेत :
- पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते.
- वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार आणि सतत होते.
- पिकाला रोजच अगर दिवसाआड अथवा गरजेनुसार पाणी दिले जाते.
- मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती, हवा यांचा नेहमी समन्वय साधला जातो.
- पाणी कमीत कमी वेगाने दिले जाते. त्यामुळे ते मुळाच्या सभोवती जिरते. ठिबक सिंचनाच्या या गुणमुळे पिके चांगली जोमाने वाढतात व दर्जेदार पीक उत्पादन मिळते.
प्रश्न : ठिबक सिंचनाचे अन्य फायदे कोणते ?
उत्तर : ठिबक सिंचनाचे अन्य फायदे खालीलप्रमाणे आहेत :
- ठिबक सिंचनाने गरजेनुसार पाणी दिल्याने झाडांच्या हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही. त्यामुळे त्यांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते.
- ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते.
- बचत झालेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्रात वापर करता येतो.
- कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही.
- दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते.
- ठिबकने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते.
- पाणी साठून राहत नाही.
- पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते.
- क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तरीही पिकांचे उत्पादन घेता येते.
- जमिनी खराब होत नाही.
- चढ-उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात.
- कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पिके घेऊन उत्पादन काढता येते.
- ठिबकने द्रवरूप खते देता येतात. खताचा १००% वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते. खताचा अपव्यय टळतो. पिकांना सम प्रमाणात खाते देता येतात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो.
- जमिनीची धूप थांबते.
- निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे.
शेतीविषयक नियमित व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करून युट्युब चॅनेल सब्सक्राइब करा.
This post is also available in:
मराठी
Leave a reply