Contents
चोकप म्हणजे नेमके काय ?
सूक्ष्म सिंचन पद्धतीमधील ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाणी हे थेंब – थेंब पिकांच्या मुळांच्या कार्यक्षम कक्षेत प्लास्टिक नळ्यांच्या व ड्रिपर्स च्या सहाय्याने दिले जाते. ड्रिपर्स ज्यातून हे थेंब – थेंब पाणी दिले जाते त्यात पाणी देण्यासाठी अतिशय छोट्या व्यासाच्या आकाराचे छिद्र असते. अशावेळी पाण्यात कचरा, क्षार किवा अन्य काही अशुद्धता आल्यास ड्रिपर्सची हि पाणी देणारी छिद्रे बंद होतात आणि संच काम करणे बंद करतो. ह्यालाच आपण ठिबक चोकप (Drip Irrigation Choke Up) झाले असे म्हणतो.
ड्रिप चोकप झाल्याने खूप नुकसानीचा सामना करावा लागतो कारण पाणी पिकास भेटत नाही परिणामी उत्पन्न कमी होते. हे असे होऊ नये म्हणून शेतकरी लगेच बंद नळ्या बदलून नवीन नळ्या बसवितात ज्याला खर्च अधिक लागतो. आज आपण ह्या लेखातून ह्या चोकपच्या समस्येबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत.
ठिबक सिंचन चोकप का होते ?
ड्रिप इरिगेशन तयार करणाऱ्या कंपन्या एका ठराविक प्रेशर रेटिंग नुसार ड्रिप तयार करीत असतात. प्रेशर रेटिंग म्हणजे काय ? प्रेशर रेटिंग म्हणजे एक ठराविक प्रेशर ज्यावर ड्रिप इरिगेशन व्यवस्थित काम करते ( १ कि.ग्रॅ / से.मी2). म्हणजेच ह्या ठरविक प्रेशर पेक्षा जर प्रेशर कमी येत असेल तर ड्रिप इरिगेशन काम करणार नाही. ह्याचाच अर्थ असा कि काही तरी अडथळा निर्माण झाल्याने प्रेशर कमी झाले व ड्रिपर्स चोकप होऊन ड्रिप इरिगेशन काम करणे बंद झाले.
बरेच शेतकरी किंवा इतर लोक म्हणतात कि ड्रिपर्सला ठोकल्याने किंवा त्यात सुई घालून साफ केल्याने हे चोकप काढता येते. पण, किती टक्केवारी पर्यंत ? साधारणतः ७० ते ८० % पर्यंत. कारण, ड्रिप संचामध्ये ड्रिपर्स ची संख्या भरपूर असते. प्रत्येक ड्रिपर अशा पद्धतीने साफ करणे शक्य नाही. म्हणजेच अशा उपायांनी हे चोकप पूर्ण साफ होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला ड्रिप चोकप होऊच नये ह्यासाठी काही करता येईल का ह्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. म्हणजेच आपल्याला हे समजले पाहिजे कि ड्रिप नेमके चोकप का होते? हे समजल्यावर आपण ते चोकप होऊ नये म्हणून उपाययोजना करू शकतो. चला तर मग आता पाहू यात नेमके काय कारण असते ड्रिप चोकप होण्याचे.
१) फिल्टर्स
ठिबक संचाचा एक महत्वाचा घटक आहे ‘ फिल्टर्स ’ ड्रिप इरिगेशन चोकप होऊच नये ह्यासाठी फिल्टर्स काय भूमिका बजावतात आणि फिल्टर्स बाबत शेतकरी बांधवांकडून काय अशा चुका होतात ज्यामुळे ड्रिप इरिगेशन चोकप होते ते आता आपण अभ्यासू –
अ) ठिबक संचामध्ये फिल्टर लावलेलाच नाही
बऱ्याच वेळेस हे पाहण्यात येते कि शेतकरी बांधव फिल्टर ठिबक संचामध्ये लावताच नाही. परिणामी पाण्यातील अशुद्धता जसे कि केर-कचरा, शेवाळ, रेतीचे कण इत्यादी पाण्यात मिसळून ड्रिप लॅटरल्सच्या जाळ्यात पसरते आणि ड्रिपर्स चोकप करते. त्यामुळे ठिबक सिंचन संचामध्ये फिल्टर आवश्य लावायला पाहिजे.
ब) फिल्टर लावला आहे पण योग्य प्रकारचा नाही
बरेच शेतकरी बांधव फिल्टर लावतात पण ते लावते वेळेस ह्याची पडताळणी करीत नाहीत कि ह्याच प्रकारच्या फिल्त्रची आवश्यकता आपल्या ठिबक सिंचन संचास आहे का ? त्यामुळे त्यांचेकडून चुकीच्या प्रकारचे फिल्टर लावले जाते जे प्राप्त परिस्थितीत व्यवस्थित काम करीत नाही आणि ड्रिप संच चोकप होऊन काम करणे बंद करतो. कुठल्या परिस्थितीत कुठला फिल्टर वापरायला पाहिजे ? ह्याबद्दल सविस्तर माहितीसाठी खालील लिंक्स वर क्लिक करा
क) फिल्टर योग्य प्रकरचे लावलेले आहेत पण त्यांची सफाई वेळेवर होत नाही
बऱ्याच वेळेस असे निदर्शनात येते कि शेतकरी बांधव फिल्टर्स ड्रिप इरिगेशन संचात लावतात पण निर्देशानुसार वेळोवेळी त्यांची सफाई करीत नाही. परिणामी फिल्टर्स कार्यक्षमरित्या काम करू शकत नाहीत आणि चोकप ची समस्या वाढते. शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेतले पाहिजे कि फिल्टर्स मध्ये साचलेली घाण वेळोवेळी साफ करावयास पाहिजे अन्यथा फिल्टर्स चोकप होतील व काम करणार नाहीत.
हे झाले एक कारण, आणखी काय कारणे असू शकतात ड्रिप इरिगेशन चोकप होण्याची ते समजून घेण्यासाठी पुढे वाचत राहा…..
दुसरे एक महत्वाचे कारण ड्रिप इरिगेशन चोकप होण्याचे आणि ते म्हणजे ड्रिप इरिगेशनची मांडणी / संरचना / डिझाईन. ते कसे चला अभ्यासू –
२) ठिबक सिंचनची मांडणी / संरचना / डिझाईन
आपण ह्या पूर्वीच पाहिले कि ड्रिप इरिगेशन हे एका प्रेशर रेटिंग नुसार बनविलेले असते. त्यामुळे ड्रिप इरिगेशन वापरात असतांना निर्देशानुसार त्याची मांडणी केली नाही तर प्रेशर कमी होऊन ड्रिप चोकप होऊन बंद पडू शकते.
बऱ्याच वेळेस असे निदर्शनास येते कि क्षेत्र जास्त असले कि खर्च वाचविण्यासाठी शेतकरी बांधव अयोग्य प्रकारे ड्रिप अंथरतात ज्यामुळे प्रेशर कमी होऊन ड्रिपची कार्यक्षमता कमी होऊन ती चोकप होते व बंद पडते. शेतकरी बांधव अशा काय चुका मांडणी करतांना करतात ते आता आपण पाहू –
अ) जास्त क्षेत्र असल्यास विभागणी चुकीची करणे
शेताचे क्षेत्र जास्त असल्यास सरसकट ड्रिप न अंथरता क्षेत्राला एक – एक एकरच्या तुकड्यात विभाजित कार्याला पाहिजे. योग्य दबावाखाली सर्व तुकड्यांमध्ये पाणी पोहोचविण्यासाठी गरजेच्या ठिकाणी कॉक्स लावायला पाहिजेत. म्हणजे प्रेशर कमी होणार नाही आणि ड्रिप व्यवस्थित काम करेल.
ब) मांडणी करतांना सबलाईनवर जास्त लॅटरल्स लावणे
ठिबक संचाची मांडणी करतांना विभाजित क्षेत्रातील सबमेन पाईप वर गरजेपेक्षा अधिक लॅटरल्स लावल्या तर ड्रिपर्सची संख्या देखील वाढते. अशा वेळेस दबाव कमी होऊन पाणी ड्रिपर्स पर्यंत पोहचत नाही व ठिबक संच काम करणे बंद होते. त्यामुळे सबमेन पाईपलाईन वर आवश्यक तेवढ्याच लॅटरल्स व्यवस्थित गणित करून लावल्या पाहिजेत.
क) लॅटरल्स जास्त लांबीवर अंथरणे
लॅटरल्स ह्या विविध व्यासाच्या आकारात उपलब्ध असतात. जसे कि १२ मि.मी / १६ मि.मी. इत्यादी. ह्यांना किती लांबीपर्यंत आपण शेतात अंथरले पाहिजे ह्याचे एक गणित ठरलेले असते. त्यापेक्षा जास्त लांबीवर लॅटरल्स अंथरल्यास पाण्याच्या प्रेशरमध्ये फरक पडतो आणि ड्रिप व्यवस्थित काम करीत नाही किंवा काम करणे बंद होते.
बऱ्याचवेळेस जेंव्हा लॅटरल्स जास्त लांबीवर अंथरल्या जातात तेंव्हा असे निदर्शनास येते कि शेवटी ड्रिपर्स व्यवस्थित काम करतात आणि सुरुवातीला नाही. हे असे का ? तर, प्रेशर तेंव्हाच निर्माण होते जेंव्हा वाहत्या पाण्यास कोठे अडथला निर्माण होतो. लॅटरल्सच्या टोकाशी त्या बंद असल्याने पाण्यास अडथला निर्माण होऊन तेथे प्रेशर वाढते आणि त्यामुळे ड्रिपर्स मधून पाणी व्यवस्थित पडते पण ते पुढे कमी – कमी होत जाते त्यामुळे सुरुवातीस ड्रिपर्स मधून पाणी पडताना दिसत नाही.
त्याकरिता लॅटरल्स ह्या निर्देशानुसार दिलेल्या योग्य लांबीवरच म्हणजे १२ मि.मी लॅटरल्स ह्या १२५ फुट आणि १६ मि.मी लॅटरल्स ह्या १८० ते २०० फुट अंथरल्या पाहिजेत. अन्यथा पाण्यचे प्रेशर कमी होत जाऊन ड्रिप काम करणे बंद करेल.
ड) लॅटरल्स हंगाम संपल्या नंतर साठवणूक करतांना
हंगाम संपल्यानंतर काही काल आपण लॅटरल्स गोळा करून साठवून ठेवतो. अशा वेळेस बऱ्याचदा शेतकरी त्या व्यवस्थित साफ न करताच गुंडाळून ठेवतात. परिणामी पाण्यत असलेली थोडीफार घाण पाण्याची वाफ झाल्यावर तेथेच साचून राहते व चोकपसाठी कारणीभूत ठरते. त्यासाठी लॅटरल्सची साठवणूक करण्याआधी त्या व्यवस्थित साफ करून मगच भांडारात ठेवल्या पाहिजेत.
३) फर्टिगेशन
ठिबक सिंचनाद्वारे पिकांच्या मुळांशी खते देण्याच्या प्रक्रियेला फर्टिगेशन असे म्हणतात. पाण्यात विरघळणारी खते आपण ठिबक द्वारे देवू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज आहे कि फर्टिगेशन केल्यानंतर काही काळ पाणी देवू नये. पण, असे केल्यास जेंव्हा खते दिल्यानंतर तुम्ही ठिबक संच बंद ठेवता तेंव्हा पाण्यात विरघळलेली खते पाण्याची वाफ झाल्यानंतर घनरूप होऊन तिथेच साचतात आणि ड्रिपर्सला चोकप करतात. म्हणून खते दिल्यानंतर नळ्या व्यवस्थित फ्लश करून मगच त्या बंद ठेवाव्यात.
अशा प्रकारे प्रस्तुत लेखातून आपण ड्रिप इरिगेशन चोकप का होते ह्याबद्दल माहिती घेतली. इंग्रजी भाषेत एक म्हण आहे ‘ Prevention is better than cure ’ म्हणजेच उपचारापेक्षा नियंत्रण बरे – जर आपल्याला ड्रिप चोकप का होते ह्या बद्दल परिपूर्ण माहिती असली तर आपण ती चोकपच होऊ देणार नाही व पुढील खर्च टळेल.
ठिबक सिंचन चोकप विषयी व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेण्याकरिता खालील व्हिडीओ नक्की पहा
ह्याच लेखाच्या पुढील भागात पाहू ड्रिप चोकप झालीच तर काय उपाय योजावेत म्हणजे ते चोकप काढता येईल आणि ड्रिप पुन्हा पूर्ववत चालू होईल.
शेतीविषयक प्रतिपूर्ण माहिती मिळवण्यासाठीहिरा ऍग्रोच्या युट्युब चॅनेलला एकदा नक्की भेट द्या.
This post is also available in:
मराठी
Leave a reply