आपल्या शेजारच्याच म्हणजे चीन या देशातून आता जगभर कोरोना विषाणू (Corona / COVID-19) आजार पसरवित आहे. दैनंदिन वापरात असणाऱ्या बऱ्याच वस्तू चीन मधून आयात झालेल्या असतात. परिणामी हा विषाणू पसरत आहे. शेती क्षेत्र सुद्धा यापासून सुटणार नाही कारण शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या निविदांना लागणारा कच्चा माल जसे कि रसायने, प्लास्टिक इत्यादी बहुतांश प्रमाणात चीन या देशातून आयात केले जातात. आपल्या शेतकरी बांधवांना ह्या विषाणूपासून कुठलाही धोका पोहचू नये करिता आम्ही हा ब्लॉग प्रसारित करीत आहोत. ह्या लेखाद्वारे आम्ही आपणास कोरोना विषाणू विषयी शास्त्रोक्त माहिती, तो कसा पसरतो, आजाराची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय ह्या संबंधी माहिती देणार आहोत. तसेच शेतीच्या अर्थकारणावर ह्याचा काय परिणाम होईल ह्याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत.
काय आहे कोरोना?
- हा एक विषाणू आहे.
- तो वेगाने वाढतो.
- वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो.
- आपल्या श्वसनसंस्थेला बाधित करतो.
कोरोना विषाणू कसा पसरतो?
कोरोना विषाणू दोन प्रकारे पसरतो.
१) रुग्णाच्या खोकल्यातून
- रुग्ण खोकलल्यावर हवेत तुषार उडतात.
- हे तुषार रुग्णाकडून हवेत पसरतात.
- या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात.
- आजूबाजूच्या व्यक्तींनी श्वास घेतल्यावर श्वासातून त्याचा संसर्ग होतो.
२) वस्तूंच्या स्पर्शातून
- रुग्णाच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूंच्या वस्तूंवर पडतात.
- त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यावर त्या वस्तू आपल्या हातांना चिकटतात.
- त्यानंतर जर हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावले तर ते आपल्या श्वसनमार्गातून जाऊन संसर्ग होतो.
आजाराची लक्षणे
- सर्दी
- घसा तीव्रपणे दुखणे
- खोकला
- ताप
- श्वास घेण्यास त्रास होणे
- डोकेदुखी
- उलट्या व जुलाब
धोकादायक लक्षणे
- तीव्र घसादुखी
- ३८ अंशापेक्षा जास्त ताप असणे
- धाप लागणे
- छातीत दुखणे
- खोकल्यावाटे रक्त पडणे
- रक्तदाब कमी होणे
- नखे निळसर काळी पडणे
- मुलांच्यामध्ये चीडचीड आणि झोपाळूपणा वाढणे
जास्त धोका कोणाला?
गरोदर माता, उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, दमा, जुना व सतत बळावणारा खोकला, कर्करोगाचे उपचार चालू असल्यास.
आजाराची शंका असल्यास
- वेळ न दवडता मान्यताप्राप्त डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- जवळच्या सरकारी इस्पितळात जाऊन ‘ कोरोना विषाणू ’ च्या निदानाची तपासणी करून घ्या.
- डॉक्टरांनी सांगितल्यास रुग्णालयात त्वरित भरती व्हा.
- ऐकीव माहिती, अफवांवर विश्वास ठेवू नका.
- अशास्त्रीय उपचार, भोंदू डॉक्टरांचे उपचार घेऊ नका.
आजार टाळण्यासाठी
- डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापरा.
- गर्दीची ठिकाणे टाळा.
- चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.
- सॅनीटायझर किंवा साध्या साबण पाण्याने हात वरचेवर धुवावेत.
- खोकला किंवा शिंका आल्यास तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा.
- टिश्यू लगेच कचरा पेटीत टाकून द्यावा.
- खोकतांना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नये, त्याऐवजी कोपर वाकवून ते तोंडासमोर धरावे.
- ताप आणि खोकला असणाऱ्या रुग्णांचा सहवास टाळावा.
- तुम्ही या विषाणूने पसरलेल्या साथीच्या भागात प्रवास केलेला असल्यास आणि जर ताप, खोकला व श्वास घ्यावयास त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरज वाटल्यास रुग्णालयात भरती व्हावे.
- प्राण्यांचा सहवास टाळावा. त्यांना स्पर्श करू नये.
- पूर्ण शिजवलेले शाकाहारी / मांसाहारी अन्न खावे.
- चिकन / मटन प्रमाणित दुकानांतूनच घ्यावे.
- तीन लिटर पाणी रोज प्यावे.
- पुरेशी आणि नियमित झोप घ्यावी व जागरण टाळावे.
- धुम्रपान व मद्यपान टाळावे.
कोरोनाबाबत गैरसमज
- चिकन, अंडी खाऊ नयेत – पूर्ण शिजवलेल्या मांसाहारातून कोरोना विषाणू पसरत नाही. ५५ अंशापेक्षा अधिक तापमानात हा विषाणू जिवंत राहत नाही.
- चीनमधून आयात झालेल्या वस्तू वापरू नयेत – आयात वस्तूंतून कोरोना पसरत नाही, तरी शंका असल्यास त्यांना निर्जंतुक करून घ्यावे. निर्जंतुक हॅण्डग्लोव्हज वापरावेत.
- लसूण खाल्याने कोरोना व्हायरस पसरत नाही – आजमितीला अशी कोणतीच वनस्पती अथवा औषध मान्यताप्राप्त नाही.
कॉरोनविषयी अधिकृत माहितीसाठी भारत सरकारच्या https://www.mygov.in/covid-19/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
कोरोना व्हायरसचा शेतीशी संबंध
शेती व्यवसायात अनेक निविष्ठा वापरल्या जातात. ह्या निविष्ठा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, रसायने, प्लास्टिक हे बहुतांशी चीन ह्या देशातून आयात केल्या जातात. परंतु वरील निवेदनात आपण पाहिले कि आयात केलेल्या वस्तूमधून कोरोन व्हायरस पसरत नाही. तरीपण आपणास शंका असल्यास आपण निर्जंतुक हॅण्डग्लोव्हज वापरावेत किंवा हात जंतुनाशकाने निर्जंतुक करून घ्यावेत.
शेतीस पूरक अशा कुक्कुटपालन ह्या व्यवसायास लोकांमध्ये पसरलेल्या गैरसमजामुळे फार मोठा फटका बसला आहे. कोरोना विषाणू हा शिजवलेल्या अन्नातून पसरत नाही. तरीही चिकन आणि अंडी ह्यांच्या विक्रीवर फरक पडला. शेतकऱ्यांना शंका वाटत असल्यास जिथे जनावरे, कोंबड्या ठेवल्या जातात ते क्षेत्र जंतुनाशके फवारून निर्जंतुक करून घ्यावे. वेळोवेळी हात स्वच्छ करावेत. जनावरांच्या संपर्कात राहतांना स्वच्छतेची काळजी घ्यावी.
शेती मध्ये बऱ्याच प्रमाणात प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर होतो. ह्या प्लास्टिकच्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टिक चीन मधून आयात होते. चीन मधून सध्या आयात मोठ्या प्रमाणावर बंद झाल्याने काही वस्तूंचे भाव वाढू शकतात तर शेतकऱ्यांनी आवश्यक अशा प्लास्टिक वस्तू जसे कि ठिबकच्या नळ्या व पाईप खरेदी करून ठेवाव्यात ज्यामुळे खर्च कमी होण्यास मदत होईल.
वरील सर्व माहिती हि मान्यताप्राप्त स्त्रोत – इंडियन मेडिकल असोशिएशन ह्यांच्या द्वारे प्रसारित केल्या गेलेली असल्याने त्या नुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास उपाय योजना कराव्यात.
शेतीविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेण्याकरिता आमच्या युट्युब चॅनेलला नक्की भेट द्या.
Leave a reply