ठिबक सिंचनाद्वारे खते कशी देतात ?
ठिबक सिंचन पद्धतीत पाण्याद्वारे पाण्यात विरघळणारी ( विद्राव्य ) खते पिकाच्या मुळांशी योग्य त्या प्रमाणात व पाहिजे त्या वेळी ( पिकांच्या गरजेनुसार ) परिणामकारकरित्या देता येतात. पाण्याबरोबर खते व मूलद्रव्ये देण्याच्या या प्रकारास शास्त्रीय भाषेत फर्टिगेशन असे म्हणतात.
ठिबक सिंचनाद्वारे खते देताना प्रमाणबद्ध आणि मात्राबद्ध पद्धतीने देता येतात. प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता खत देण्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये स्थिर राहते. खतमात्रा व पाण्याचा प्रवाह सतत एकसारखा राहतो. उदा. एक लिटर खत द्रावण आणि 100 लिटर पाणी या पद्धतीमध्ये खतमात्रा तीव्रतेच्या स्वरूपात म्हणजेच “पीपीएम’मध्ये मोजली जाते. मात्राबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता बदलत राहते. ठिबक सिंचनाद्वारे खत मिश्रित व खत विरहित पाणी पिकाच्या मुळांशी सतत दिले जाते. या पद्धतीमध्ये खतमात्रा कि. ग्रॅम/हेक्टर या स्वरूपात मोजली जाते.
फर्टिगेशनचे फायदे –
- खतांचा अधिक कार्यक्षमतेने वापर. द्रवरूप खत पिकांच्या मुळांद्वारे लवकर शोषली जातात. त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो. त्यामुळे खतमात्रेत २५ ते ५० टकके बचत होते. तर पाण्यामध्ये ३० ते ५० टक्के बचत होते
- खतांच्या उपलब्धतेत वाढ. पिकांच्या मुळांच्या जवळच खत आणि पाणी दिलं जातं. त्यामुळे खत आणि पाणी यांची वापरक्षमता वाढते
- मजुरीच्या खर्चात बचत
- पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात खत देता येतात
- दर्जेदार व अधिक उत्पन्न मिळते. पीक लवकर तयार होते. उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते
- जमीनीच आरोग्य अबाधित राखलं जात
- द्रवरूप खतातून पिकाला लागणारी सर्वच्या सर्व अन्नद्रव्य एकाच वेळी दिली जातात
- हलक्या प्रतीच्या जमिनीत देखील पिकं घेता येतात
- आम्लयुक्त विद्राव्य खतामुळे ठिबक संचामध्ये आपोआप रासायनिक स्वच्छता होते
- पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार आवश्यक त्या प्रमाणात खत देता येतात
- खतांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत वाढविता येते
- विद्राव्य खतांमध्ये सोडियम आणि क्लोरिनचे प्रमाण अतिशय कमी असते
- सूक्ष्म द्रवरूप खतांची फवारणी पिकांवर त्वरित करता येते
फर्टिगेशनसाठी खते निवडतांना घ्यावयाची काळजी –
- खते पाण्यामध्ये लवकरात लवकर विरघळणारी असावीत
- खतांची विरघळण्याची क्षमता अधिक असावी
- पाण्यात विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरुपात एकत्रीकरण होता कामा नये
- खताच्या संचाच्या घटकांवर कोणताही परिणाम होणार नाही अशी खते निवडावीत
- खते शेतातील वापरासाठी सुरक्षित असावीत
- खतांची पाण्यात असणाऱ्या क्षारांबरोबर कोणत्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया होणार नाही याची काळजी घ्यावी
- एकाच वेळी एकापेक्षा अधिक खते एकत्र द्यावयाची असल्यास त्यांची आपापसात कोणतीही रासायनिक अभिक्रिया होणार नाही अशीच खते एकत्रित द्यावीत. ठिबक संचातून युरिया, डायअमोनियम फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश हि खते देता येतात
फर्टिगेशनसाठी उपकरणे –
सूक्ष्म सिंचन संचातून पिकांना विद्राव्य खते देण्यासाठी प्रामुख्याने खताची टाकी / फर्टिलायझर टँक , व्हेन्चुरी इंजेक्शन पंप इत्यादी उपकरणे वापरली जातात. वर नमूद सर्व उपकरणांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे व फायदेशीर असे उपकरण आहे व्हेन्चुरी.
व्हेन्चुरी तंत्रज्ञान –
व्हेन्चुरी हि डमरूच्या आकाराची मध्यभागी कमी होत जाणारी व्यासाची असल्यामुळे पाण्याचा वाहण्याचा वेग वाढतो व व्हेन्चुरीच्या मध्यभागी उपलब्ध दाब कमी होऊन हवेची पोकळी निर्माण होते ( व्हॅकयूम ). ह्यामुळे खताच्या टाकीमधील खताच्या द्रावणाचे शोषण होऊन पुढे मुख्य नळीमधून संचामध्ये आलेले खत उपनळ्यांमधून सिंचनाच्या वेळी ड्रीपर्समार्फत पिकांच्या मुळांजवळ दिले जाते.
खत टाकीमधील पाण्यात मिसळावे व नंतर त्या टाकीत व्हेन्चुरी नलिकेतून निघालेली नळी सोडण्यात यावी.ठिबक सिंचन संच सुरु केल्यानंतर दोन्ही नियंत्रण झडपा सुरु केल्या कि मग टाकीतील खते व्हेन्चुरीतून शोषले/ ओढले जातात व ते संचाच्या पाईपमधील पाण्याच्या प्रवाहात मिसळून उपनलीकेवरील असलेल्या ड्रीपरमधून झाडांच्या / पिकांच्या मुळांच्या कक्षेत सोडले जातात.
Leave a reply