Profitable Farming
पूर्वीच्या काळी असे म्हटले जायचे कि उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण, आज हे चित्र पूर्णतः बदललेले आढळते. कारण, हवामान बदल व त्यांचा उत्पादकतेवर परिणाम, कीड व रोगांचा हल्ला, जमिनीची कमी होत जाणारी सुपिकता, मजुरांची उपलब्धता आणि मजुरीवरील खर्च ह्या सर्व बाबींमुळे शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे.
शेती व्यवसायात नफा कमवायचा असल्यास दोनच पर्याय उपलब्ध आहेत, एक तर उत्पन्नात वाढ झाली पाहिजे किंवा खर्चात घट झाली पाहिजे. उत्पन्नात वाढ होणे बऱ्याच अंशी पाउस व हवामान ह्यांच्यावर अवलंबून आहे. तसेच, उत्पन्नात वाढ जरी झाली तरी उत्पादनास जर व्यवस्थित भाव नाही भेटला तर नफा कमविणे निव्वळ अशक्य आहे. मग, एकच पर्याय आपल्यासमोर उरतो आणि तो म्हणजे खर्चात कपात करणे.
खर्चात कपात करण्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्राचा अवलंब करावा लागेल. जेणेकरून आपण उपलब्ध संसाधनांचा व्यवस्थित व काटकसरीने वापर करू शकू. अशी तंत्रज्ञाने वापरतांना सुरुवातीचा खर्च काहीसा अधिक होऊ शकतो, पण मग नंतर वर्षानुवर्षे आपण ह्या तंत्रज्ञानांचा उपयोग करून शेती व्यवसायातील बरेचसे खर्च वाचवू शकतो आणि उत्पादन खर्च कमी करू शकतो.
अशी तंत्रज्ञाने कशी निवडाल ? कुठे भेटतील ? कशी वापरावीत ? ह्याचे ज्ञान आपल्याला घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण आज तोट्यात चालणारा शेती व्यवसाय फायद्यात आणू शकु. तंत्रज्ञाने निवडतांना त्यावर कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त काम कसे करून घेता येईल यावरही भर द्यावा लागेल. त्यासाठी अशी उत्पादने खरेदी करावी लागतील ज्यांच्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम ह्यांची बचत होऊ शकेल. मजुरांची उपलब्धता आणि त्यांचेवर होणारा खर्च हि पण एक ह्यावेळेस लक्षात घेण्यासारखी बाब आहे. कमीत कमी मजूर वापरून आपण कसे योग्य तंत्रज्ञान वापरू शकतो ह्यावर भर द्यावा लागेल.
आता प्रश्न हा पडतो कि अशी कोणती तंत्रज्ञाने आहेत ज्यांचा वापर आपण खर्च कमी करण्यासाठी सुलभतेने आणि कमी खर्चात करू शकतो ? ह्याला उत्तर असे आहे कि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व योग्य प्रमाणात वापर करावयाचा असेल तर आपण सूक्ष्म सिंचन पद्धती जसे कि ठिबक सिंचन, तुषार सिंचन ह्यांचा वापर करू शकतो. खतांवरील खर्च कमी करण्यासाठी आपण ठिबकद्वारे खते देण्याचे तंत्र ‘ फर्टिगेशन ’ वापरू शकतो, जमिनीतून बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा ऱ्हास कमी करण्यासाठी आपण प्लास्टिक मल्चिंग चा वापर करू शकतो, मल्चिंग मुळे तणांची अनावश्यक वाढ थांबून निंदणीचा खर्च हि थांबेल.
खर्च कमी करण्यासाठी आपण प्रगत तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. ह्यात कृषी यांत्रिकीकरणाचा देखील समावेश होतो. आपण अशी उपकरणे वापरावयास हवी जी कमी वेळेत, कमी मजुरांमध्ये आणि कमी खर्चात शेतीची वेगवेगळी अनेक कामे करू शकतील. उदाहरणार्थ ब्रश कटर सारखे उपकरण ज्याला आपण विविध अॅटेचमेंटस लावून शेतीची अनेक कामे अगदी सहज आणि कमी खर्चात करू शकतो. ब्रश कटर हे एक बहुपयोगी कृषी उपकरण आहे ज्याचा उपयोग आपण तण काढण्यासाठी, छोटी झुडपे कापण्यासाठी, शेताची आंतरमशागत करण्यासाठी तसेच पिकांची कापणी करण्यासाठी करू शकतो.
सध्या बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. त्याकरिता त्यांना सेंद्रिय निविदा वापरणे गरजेचे आहे. सेंद्रिय खते एक महत्वाची निविदा आहे जी सेंद्रिय शेतीत पिकांना अन्नद्रव्ये पुरविण्याचे काम करतात. जर हि खते आपण शेतावरच तयार केली आणि वापरली तर मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो. सेंद्रिय खतांच्या प्रकारातील एक महत्वाचे खत आहे गांडूळ खत. ज्याच्या वापरामुळे शेतीत अन्नद्रव्ये तर मिसळली जातातच शिवाय जमिनीचा पोत हि सुधारतो. हे खत जर पारंपारिक पद्धतीने तयार करायचे ठरवले तर त्यासाठी हौद बांधावा लागेल आणि त्यात खर्च होईल. शिवाय गांडूळ खतातील मुख्य घटक व्हर्मीवॉश जमा करण्याची त्यात सोय राहणार नाही. ह्याला पर्याय म्हणजे पॉलीइथिलीन चे बनलेले तयार बेड्स वापरणे ज्यांना व्हर्मीबेड म्हणून ओळखतात.
ह्या लेखाद्वारे आपण ह्या सर्व उपाय योजनांविषयी विस्ताराने जाणून घेणार आहोत.
सूक्ष्म सिंचन प्रणालीचे खर्च कमी करण्यात योगदान
पिकांसाठी आवश्यक असलेले पाणी पिकांना मोजून – मापून, योग्य प्रमाणात व योग्य त्याच ठिकाणी देण्याच्या पद्धतीस सूक्ष्म सिंचन प्रणाली असे म्हणतात. ह्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि रेनगन सिंचन ह्या पद्धतींचा समावेश होतो.
ठिबक सिंचन
उपलब्ध पाणी योग्य प्रमाणात थेंबा थेंबाने पिकांच्या मूळांच्या कार्यक्षम कक्षेत प्लास्टिक चे पाईप व नळ्या यांचेमार्फत देण्याच्या पद्धतीस ठिबक सिंचन असे म्हणतात.
ठिबक सिंचन पद्धतीची वैशिष्ट्ये
१) पिकांच्या गरजेप्रमाणे मोजमाप करून व काटेकोरपणे पाणी देता येते.
२) पाणी कमीत कमी मात्रेत देता येते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो.
३) पिकास पाणी दररोज व एकदिवसाआड देता येते.
४) पानी पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेत देता येते.
५) पाणी पिकांना सारख्या प्रमाणात देता येते.
६) खते, औषधे, संजीवके ठिबक सिंचनाद्वारे देता येतात त्यामुळे त्यांचा अपव्यय टळतो.
७) पिकांच्या सान्निध्यातील सूक्ष्म हवामानाचा समतोल राखला जातो. तसेच मुळांच्या कार्यक्षेत्रात हवा व पाणी यांचे प्रमाण पोषक राखले जाते.
८) पिकांची वाढ जोमदार होते व पिके टवटवीत दिसतात.
९) हलक्या प्रकारच्या जमिनीत पिके घेता येतात.
१०) भरघोस व दर्जेदार उत्पन्न मिळते.
ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे
१. ठिबक सिंचनाने गरजेनुसार पाणी दिल्याने झाडांच्या हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही. त्यामुळे त्यांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते.
२. ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते.
३. बचत झालेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्रात वापर करता येतो.
४. कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही.
५. दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते.
६. ठिबकने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते.
७. पाणी साठून राहत नाही.
८. पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते.
९. क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तरीही पिकांचे उत्पादन घेता येते.
१०. जमिनी खराब होत नाही.
११. चढ-उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात.
१२. कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पिके घेऊन उत्पादन काढता येते.
१३. ठिबकने द्रवरूप खते देता येतात. खताचा १००% वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते. खताचा अपव्यय टळतो. पिकांना सम प्रमाणात खाते देता येतात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो.
१४. जमिनीची धूप थांबते.
१५. निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे.
तुषार सिंचन
तुषार सिंचन पद्धतीमध्ये अॅल्युमिनियम किंवा पी.व्ही.सी. पाईप ला जोडलेल्या स्प्रिंकलर नोझल्सव्दारे पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकांवर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाते. पाण्याच्या दाबाचा वापर करून नोझल्स ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररित्या फिरवण्याची सोय असते. पाईपमधून दाबाने आलेले पाणी नोझल्समधून तुषारासारखे पिकांवर फवारले जाते.
तुषार सिंचन पद्धतीचे फायदे
- प्रवाही सिंचनापेक्षा तुषार पद्धतीत पाण्याचा अपव्यय होत नसून सिंचन क्षमता हि प्रवाही सिंचनापेक्षा जास्त मिळते. (७० ते ८० टक्के)
- तुषार किंवा फवारा सिंचन पद्धती जवळ जवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.
- फवारा सिंचनामुळे पाण्याची जवळ जवळ २५ ते ३५ टक्के बचत होते.
- सर्व ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे पाणी देता येते.
- पाण्याचा प्रवाह कमी असतांना सुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.
- तुषार पद्धतीत पाणी पावसाप्रमाणेच पाणी पिकांवर पडत असल्याने पानांवरील किडे धुवून जाऊन पाने स्वच्छ राहतात.
- या सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खते पाण्याबरोबर पिकास देता येतात. सर्व ठिकाणी सारखे आणि पाहिजे तेवढेच खत दिल्यामुळे रासायनिक खते पिकांच्या मुळाच्या कक्षेतच राहतात. यामुळे खतांचा कार्यक्षमरित्या वापर होवून बचत होते.
- तुषार सिंचन पद्धतीचा दर एकरी सुरवातीस लागणारा खर्च ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा कमी आहे.
- तुषार सिंचन पद्धतीकरिता जमिनीच्या सपाटीकरणाची गरज नाही.
- १०. रान बांधणी करावी लागत नाही.
- ११. मजुरांवरील खर्च कमी येतो.
- १२. पिक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ होते.
रेनगन सिंचन
अवर्षणग्रस्त परिस्थिती,शेतकऱ्यांची आर्थिक हलाखी, अश्या वेळीस मदतीस धावून आली ती सूक्ष्म सिंचन प्रणाली. ह्याच प्रणालीतील एक घटक म्हणजे तुषार सिंचन. पिकांना फवाऱ्यासारखे पाणी या पद्धतीद्वारे देता येते. ह्या प्रणालीतील अतिआधुनिक प्रकार म्हणजे पिकांना पावसासारखे फवारून पाणी देण्यासाठी विकसित केलेली तुषार सिंचन पद्धती- रेनगन.
रेनगनचे पाणी पावसासारखे पडत असल्याने पिकांच्या पानावरील धूळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो. त्यामुळे अन्नद्रव्ये तयार करण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते व उत्पादन वाढते.
रेनगन पद्धतीची वैशिष्ठ्ये
१) पिकांवर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावणसरीसारखे रीमझिम पडते.
२) जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येतात.
३) रेनगन डोंगराळ, चढ-उताराच्या जमिनी, ओलितासाठी सहज वापरता येते.
४) पानावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून व किडींपासून संरक्षण मिळते.
५) अति उन्हात व कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आद्रता वाढते व त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते.
६) वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड असते. अश्या वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन फायदेशीर आहे.
७) पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक पाण्यात मिसळून द्रवरुपात पिकाला मिळतात.
८) विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलीअर स्प्रे प्रमाणे अन्न्न्घटक पिकास मिळतात.
९) ऊस, भाजीपाला, केळी, द्राक्ष, कांदा,बटाटा, भुईमुग,चहा,कॉफी,कापूस, तृणधान्य, गळीतधान्य या पिकांना अत्यंत उपयोगी आहे.
शेतीचे यांत्रिकीकरण – ब्रश कटर चे खर्च कमी करण्यात योगदान
एक बहुपयोगी कृषी उपकरण – भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून आहे कारण ६० ते ७० % भारतीय शेती करतात. शेतीव्यवस्था कोलमडली तर त्याचा बराच मोठा परिणाम इतर क्षेत्रांवरही होतो. त्यामुळे शेतीस समृद्ध करण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान व आधुनिक उपकरणे वापरणे हि एक आजच्या काळाची गरज बनली आहे शेतातील तणांचे वेळेत व योग्य पद्धतीने व्यवस्थापन हि एक प्रमुख बाब आहे. वेळच्या वेळी तण नियंत्रण न केल्यास तणांची मुख्य पिकांशी स्पर्धा होऊन उत्पादनात फार मोठी घट होऊ शकते. पारंपारिक पद्धतीनुसार शेतातील तणांचे नियंत्रणासाठी विळ्याचा वापर केला जातो. परंतु सध्या उपलब्ध मनुष्यबळ व वेळेची उपलब्धता, निंदणीचा मजुरी खर्च आणि तणनाशकांची किंमत इत्यादी घटकांचा विचार केल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कमीत कमी मनुष्यबळ व पैशांचा वापर करून तण व्यवस्थापन करणे आवश्यक व गरजेचे झाले आहे.
२१वे शतक हे यंत्रयुग म्हणून ओळखले जाते. सध्याच्या काळात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतीसाठीही नवनवीन उत्पादने बनवली जात आहेत. ज्यामुळे पूर्वीसारखी घाम गाळणारी व अतिरिक्त वेळ खर्च करावी लागणारी शेती आता बदलतेय. शेतकऱ्याचा शेती करण्याचा अनुभव आनंददायी व सुलभ व्हावा यासाठी ब्रश कटर सारखे बहुपयोगी कृषी उपकरण अस्तित्वात आले. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव बघता हे यंत्र शेतीतील कंटाळवाण्या व वेळखाऊ कामांसाठी वरदान ठरते आहे. ब्रश कटर विरळणी, निंदणी , खुरपणी, कोळपणी या आंतरमशागतीच्या कामांसहित पिकांच्या कापणी / चोंदणी साठी हि खूप उपयोगी आहे. ब्रश कटर हे शेतीव्यवसायाला ‘ हार्ड वर्क ’ कडून ‘ स्मार्ट वर्क ’ कडे घेऊन जात आहे असं काही शेतकरी सांगतात.
ब्रश कटरचा उपयोग
या यंत्राचा वापर खालील कामांसाठी करता येतो
1) फळबाग व पिकातील गवत काढण्यासाठी.
2) चारा पिके (लसूनघास, बरसीम, धैंचा इ.) व धान्य ( गहू, भात, ज्वारी, बाजरी, करडई, सोयाबीन इ. ) कापणीसाठी .
3) फळबाग छाटणी साठी.
४) लॉन (बागेतील हिरवळ) कापून समतोल करण्यासाठी
५) पॉलिहाउस व ग्रीनहाउस प्रकारच्या शेतीत याचा अधिक वापर होतो
६) अनावश्यक झुडुपे कापण्यासाठी.
७) बागेतील झुडूपांना आकार देण्यासाठी.
८) बांधावरील / रस्त्यालगतच्या गवतास कापण्यासाठी व झुडुपे छाटण्यासाठी.
शेतीची अनेक कामे ब्रश कटर मशीन अगदी सहज आणि कमी खर्चात करते त्यामुळे खूप फायदेशीर असे आहे. परंतु, ह्याची निवड करतांना 2 – स्ट्रोक, पेट्रोलवर चालणारे, बॅकपॅक प्रकाराचेच ब्रश कटर निवडावे.
प्रगत तंत्राचा वापर करून खर्चात कपात – मल्चिंग पेपर
पावसाची कमी, पाण्याची कमतरता, वाढत्या उष्णतेमुळे जमिनीवरून होणार वाढीव बाष्पीभवन यामुळे भारतातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अश्या परिस्थितीत मल्चिंग पेपर सारखे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. मल्चिंग पेपरच्या च्या मदतीने शेती हा शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेक शेतकऱ्यांसमोर जमिनीची घटत जाणारी सुपीकता हा एक भेडसावणारा प्रश्न आहे ह्यावर उपाय आहे – शेतीसाठी मल्चिंग पेपरचा वापर.
काय आहे प्लास्टिक मल्चिंग?
शेतात लागवड केलेल्या पिकांच्या / झाडांच्या जमिनीस प्लास्टिक फिल्मच्या सहाय्याने चहुबाजूंनी व्यवस्थित झाकण्याच्या प्रक्रियेला प्लास्टीक मल्चिंग असे म्हणतात.
मल्चिंग साठी लागणारी प्लास्टिक फिल्म हि अनेक रंगात उपलब्ध आहे. जसेकी काळा, दुधाळ, निळा, पारदर्शी
१) काळी फिल्म :- ह्या फिल्मच्या काळ्या रंगामुळे जमिनीतील आद्रतेचे संरक्षण, तापमानाचे नियमन होते. तसेच तणांची वाढ रोखल्या जाते. खासकरून फळबागांमध्ये काळ्या रंगाच्या प्लास्टिक फिल्मचा वापर होतो. ह्या फिल्मचा वापर मोठ्या प्रमाणावर मल्चिंगसाठी केला जातो.
२) दुधाळ फिल्म :- शेतजमिनीतील आद्रता संरक्षण, तण नियंत्रण व तापमान नियंत्रण.
३) पारदर्शी फिल्म :- जमिनीच्या सोलरायझेषण करिता प्रयोगात आणतात. थंड हवामानाच्या प्रदेशात हिचा वापर होतो.
४) निळी फिल्म :- शेततळ्यांच्या आच्छादणासाठी वापरता येते.
फिल्मची रुंदी :-
प्लास्टिक मल्चिंगसाठी फिल्मची निवड करताना तिची रुंदी लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणतः हि रुंदी ९०-१८० से.मी असते.
फिल्मची जाडी :-
फिल्मची जाडी हि पिकाचा प्रकार व वयावर अवलंबून असते. भाजीपाला पिकांसाठी २५-३० मायक्रॉन व फळ बागांसाठी १०० मायक्रॉन.
शेतात मल्चिंग करतांना घ्यावयाची दक्षता :-
१) प्लास्टिक फिल्म सकाळी लवकर किंवा संध्याकाळी अंथरावी.
२) फिल्म जास्त ताणू नये.
३) ठिबक नळ्यांना इजा पोहोचू नये याची दक्षता घेऊन फिल्मला छिद्रे पाडावीत.
४) छिद्रे एकसमान असावीत व फिल्म फाटू नये याची दक्षता घ्यावी.
५) मातीचा भराव दोन्ही बाजूस सारखा ठेवावा.
६) फिल्मची घडी नेहमी गोल गुंढाळूनच करावी.
७) फिल्मला फाटण्यापासून वाचवावे जेणेकरून ती परत वापरता येईल. फिल्मची साठवण सावलीत सुरक्षित ठिकाणी करा.
मल्चिंग पेपरचे फायदे
१) बाष्पीभवनामुळे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबवते. त्यामुळे पाण्याची बचत होते.
२) बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते.
३) खतांच्या वापरात बचत होते. कारण खतांचे पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
४) जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो.
५) वार्षिक तणाच्या वाढीस प्रतिकार होतो. कारण सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही.
६) प्लॅस्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी-रोग दूर जातात. त्यांचे प्रमाण कमी होते.
७) जमिनीचे तापमान वाढते. जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
८) आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक असते.लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक होते.
९) पेपरखालील जमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात. उगवण २-३ दिवस लवकर होते.
१०) भुईमुगासारख्या पिकात मुळांवरील वरील गाठींचे प्रमाण वाढते.
११) सूत्रकृमींचे प्रमाण कमी होते. पावसाच्या थेंबामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.
प्रगत तंत्राचा वापर करून खर्चात कपात – व्हर्मीबेड
व्हर्मीबेड म्हणजे सेंद्रिय शेतीस आवश्यक अशा गांडूळ खताच्या निर्मितीसाठी वापरात येणारे प्लास्टिक पासून बनलेले बेड्स.
बरेच शेतकरी शेतीसाठी जोडधंदा म्हणून गाय, म्हशी व ईतर प्राणी पाळतात. यांच्यापासून मिळालेले शेण ते एकतर इतर शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकतात किंवा त्यास कुजवून आपल्या शेतात त्याचा शेणखत म्हणून वापरतात. परंतु असे न करता शेतकऱ्यांनी एक व्हर्मीबेड आणून जर या मिळालेल्या शेणापासून गांडूळ खत बनविले तर त्याचा त्यांना खूप मोठा फायदा होईल. शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. याद्वारे बनविलेले गांडूळखत एकतर आपण आपल्या शेतात वापरून एक चांगले सेंद्रिय पिक घेवू शकतो. किंवा या खताची ईतर शेतकऱ्यांना विक्री देखील करू शकतो. हा शेती साठी एक चांगला जोडधंदा देखील आहे. गांडूळखत वापरून सेंद्रिय शेतीमध्ये घेतलेल्या अशा पिकांना बाजारभाव देखील खूप चांगला मिळतो.
या गांडूळखताचा वापर करून सेंद्रिय शेती केल्यास पिकांची गुणवत्ता देखील खूप चांगली राहते. यावरून आपणास गांडूळखताची उपयुक्तता लक्षात येईल. गांडूळखत बनविणे अतिशय सोपे आहे या खताच्या निर्मितीसाठी खर्च देखील खूप कमी येतो. सेंद्रिय शेतीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होत असल्याने याद्वारे घेतलेल्या उत्पादनांचा प्रचार करणे सोपे जाते तसेच याची मार्केटिंग देखील थेट करता येते.
व्हर्मीबेडची वैशिष्ट्ये
१) उभारणीस सोपे, बांबूचा उपयोग करून उभारू शकतो. कुठल्याच बांधकामाची गरज नाही. कमी जागा लागते.
२) हाताळणी व हलवा – हलव करण्यास सोपा.
३) २५० GSM सिलपॉलिन पासून बनलेले असतात.
४) वर्मीबेडमुळे गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया सुलभ झाली आहे. कमी वेळेत ६ ते ८ टन गांडूळ खत ह्या बेड्स पासून आपल्याला मिळते.
५) टारपॉलिन पासून बनविलेले असल्याने सरासरी १० वर्षे आयुष्य.
६) हवा खेळती राहण्यासाठी बेडला जाळीच्या खिडक्या दिलेल्या आहेत ज्यामुळे गांडूळ खत बनण्याची प्रक्रिया जलद होते.
७) व्हर्मीवॉश जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. व्हर्मीवॉश द्रवरूप खत व वृद्धी संप्रेरक म्हणून कार्य करते.
८) गांडूळ खतासहित भरपूर प्रमाणात गांडूळांची सुद्धा बेड मध्ये उत्पत्ती होते. जे आपण पुढे आणखी खत बनविण्यासाठी वापरू शकतो.
९) गांडुळे जमिनीत जाण्याची शक्यता नाही कारण खालच्या बाजूस बंद.
उपलब्धता –
तीन आकारात उपलब्ध असतात
१) ४ x ४ x २ ft. – लहान
२) ८ x ४ x २ ft. – मध्यम
३) १२ x ४ x २ ft. – मोठे
अशाप्रकारे आपण विविध उपाययोजनांचा उपयोग करून शेतीवर होणाऱ्या खर्चात कपात करून शेतीला व्यवसायाचे स्वरूप देऊ शकतो आणि नफा कमाऊ शकतो.
कृषी क्षेत्रासाठी लागणाऱ्या निविदांच्या उत्पादनात अग्रेसर, सिंचन उत्पादनांसाठी प्रसिद्ध अशी हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव (महाराष्ट्र) शेतकऱ्यांना समृद्ध बनविण्यासाठी वर नमूद सर्व उपाययोजनांसाठी लागणारे साहित्य निर्मिती व विक्रीच्या व्यवसायात आहे. आपल्या स्वतः च्या आधुनिक ऑनलाईन मार्केटिंग प्रणालीद्वारे त्यांनी भारतभर आपली उत्पादने पसरवली आहेत.
2 comments on “शेती कशी होईल फायद्याची?”
Ram Kumar Singh Mahla
Dear Sir,
I am required content in Hindi or English. I am not understanding the Marathi language. Please send the articles in these two languages only.
Thanks and regards
Ram Kumar Singh Mahla
mahlaramkumar86
Dear Sir,
Your articles and programs are very much effective. But most of them are written in Marathi Language. I can understand either Hindi or English. Request correspondence with me in these two languages.