1. प्रस्तावना :-
फिल्टर -सॅण्ड फिल्टरची गरज का आहे ? शेती करतांना सिंचनासाठी आपण विविध पाण्याच्या स्त्रोतापासून जसे कि नदी, नाले, कालवे, शेततळे, विहिरी, बोअरवेल इत्यादी. पाणी शेतापर्यंत आणत असतो. हे पाणी शेतात आणतांना, नंतर पुढे सिंचनासाठी वापर करीत असतांना पाण्यातील केर-कचरा तसेच शेवाळ किंवा रेती, क्षारपाण्यात मिसळून येतात व पुढे सिंचन संचास त्रासदायक ठरू शकतात. अश्यावेळी सिंचन संचातील घटक जसे कि ड्रिपर्स चोक – अप होऊन नुकसान होऊ शकते. ह्यावर उपाय काय ? तर, सिंचन प्रणालीमध्ये योग्य प्रकारच्या फिल्टरचा वापर केला गेला पाहिजे. म्हणजे केर कचरा किंवा इतर घाण पुढे जाऊन सिंचन संचातील घटकांस नुकसान पोहचवणार नाही.
सॅण्ड फिल्टर नेमक आहे काय ?
प्रामुख्याने फिल्टर्स चे दोन प्रकार पडतात.
१) प्रायमरी फिल्टर्स
२) सेकंडरी फिल्टर्स
१) प्रायमरी फिल्टर्स :- ह्याचे दोन प्रकार आहेत.
अ) वाळूची गाळण यंत्रणा (सॅण्ड फिल्टर) => शेवाळ व काडी – कचऱ्यासाठी
ब) शंकू फिल्टर (हायड्रोसायक्लॉन फिल्टर) => पाण्यात रेताड येत असल्यास
२) सेकंडरी फिल्टर्स:- ह्याचे दोन प्रकार आहेत.
अ) जाळीची गाळण यंत्रणा ( स्क्रिन फिल्टर )
ब) चकतीची गाळण यंत्रणा ( डिस्क फिल्टर )
सॅण्ड फिल्टर :-
सॅण्ड फिल्टर हे धातूचे बनलेले असते ज्याच्या टाकिस बाहेरून पावडर कोटिंग द्वारे रंग दिलेला असतो . सॅण्ड फिल्टर मध्ये तीन वेगवेगळ्या आकारांच्या वाळूच्या कणांचे मिश्रण असते. हि वाळू साधी नसून विशिष्ठ प्रकारची असते. या वाळूच्या कणांना विशिष्ठ प्रकारची धार दिलेली असते. पाण्यात मिसळलेली घाण शेवाळ, केर-कचरा इ. यावर पडल्यास जमा होऊन जाते व स्वच्छ पाणी पुढे जाते. परिणामी स्क्रिन फिल्टरची जाळी वारंवार चोक अप होत नाही.
सॅण्ड फिल्टर कसं काम करत ?
पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात येणारी हि घाण उदा: शेवाळ, कचरा सॅण्ड फिल्टर मध्ये जमा झाली की फिल्टर मधील कार्यक्षम व विशिष्ठ प्रकारे धार दिल्या गेलेली वाळू (सॅण्ड ) ह्या घाणीचे छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतर करून पाणी आउटलेट द्वारे पुढे पाठविते. आता हि छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतरीत झालेली घाण पाण्यासोबत पुढे जाण्याची शक्यता आहे. म्हणून ती आडविण्यासाठी संचाच्या मांडणीमध्ये पुढे स्क्रिन फिल्टरची किंवा डिस्क फिल्टरची आवश्यकता आहे.
सॅण्ड फिल्टरचा वापर नेमका करावा कुठं ?
आकृती:- पाण्याचे खुले स्त्रोत:- अ) नदी ब) कालवा/ नाला क) धरणड) तळे इ) शेततळे .
- जेथे उघड्या पाण्याचा स्त्रोत आहे उदा:- नदी, नाला,धरण, तळे, शेततळे इ. तेथे शेवाळ निर्मिती जास्त प्रमाणात होते. तसेच मोठ्या प्रमाणात केर-कचरा वाऱ्याने उडत येऊन पाण्यात साचतो. हे शेवाळ, कचरा मोठ्या प्रमाणात पाण्यात मिसळून शेता पर्यंत येते. ह्यामुळे स्क्रिन फिल्टरची जाळी चोक अप होऊ शकते. परिणामी ठीबकच्या नळ्या व ड्रीपर्स चोक होऊन संपूर्ण ठिबक संचच बंद होण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत सॅण्ड फिल्टर वापरणे गरजेचे आहे.
- सॅण्ड फिल्टर मोठ्या प्रमाणात पाण्यासोबत आलेली घाण शेवाळ, केर-कचरा छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतरीत करते व पाणी पुढे पाठविते. नंतर सेकंडरी फिल्टर ( स्क्रिन किंवा डिस्क फिल्टर) उरलेला कचरा पाण्यातून काढून टाकून स्वच्छ पाणी ठिबक संचास पुरविते.
सॅण्ड फिल्टर वापरण्याचे फायदे
१) सॅण्ड फिल्टर पाण्यासोबत आलेली घाण जसे शेवाळ, कचरा ह्यांचे बारीकसारीक तुकड्यात रुपांतर करून पाणी पुढे संचास पाठविते.
२) सॅण्ड फिल्टर निर्देशाप्रमाणे वापरल्यास ड्रिप नळ्या चोक – अप होऊन होणारे मोठे नुकसान टळते.
३) सॅण्ड फिल्टर हे दणकट धातूचे बनलेले असल्याने त्याचे आयुष्यमान अधिक असते व ते वारंवार बदलावे लागत नाही.
४) सॅण्ड फिल्टर हे हाताळण्यासाठी व स्वच्छ करण्यासाठी अतिशय सोपे आहे.
५) सॅण्ड फिल्टर गरजेनुसार पाण्याच्या प्रवाहानुसार उपलब्ध होते.
सॅण्ड फिल्टरची निगा कशी राखावी?
धरणे, नद्या, कालवे यांतील पाण्यातून येणारे शेवाळ, सेंद्रिय पदार्थ व कचरा वेगळा करण्यासाठी सॅण्ड / ग्रॅव्हेल फिल्टरचा उपयोग होतो. ग्रॅव्हेल फिल्टरच्या अगोदर व पुढे असे २ दाबमापक यंत्रे (प्रेशर गेज) बसवलेले असतात. दाबमापक यंत्रातील पाण्याच्या दाबाचे १० टक्क्यापेक्षा जास्त पतन झाल्यास ग्रॅव्हेल फिल्टर साफ करावे, किंवा आठवड्यातून एकदा साफ करावे. याची स्वच्छता करताना बॅक फ्लशिंग (विरुध्द प्रवाह) तंत्राचा वापर करतात. याद्वारे पाण्याचा प्रवाह विरुध्द दिशेने करून फिल्टर साफ केले जाते ते खालीलप्रमाणे:
- सिंचनप्रणाली चालू असताना बायपास व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा करून बॅक फ्लशिंग व्हॉल्व्ह पूर्णपणे चालू करावा.
- मुख्य कंट्रोल व्हॉल्व्ह व आऊटलेट व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद करावा.
- फ्लशिंग करते वेळी बायपास व्हॉल्व्ह अंशत: बंद करून सिंचन प्रणालीचा दाब सामान्य दाबापेक्षा ३० टक्के अधिक वाढवावा.
- बॅक फ्लश व्हॉल्व्हमधून स्वच्छ पाणी येईपर्यंत पंप चालू ठेवावा. स्वच्छ पाणी आल्यानंतर पंप बंद करावा.
खालील आकृती द्वारे सॅण्ड फिल्टर साफ करावयाचे असतांना वापरायची पद्धत समजावून सांगितली आहे.
जेंव्हा सर्वप्रथम वाळू सॅण्ड फिल्टरमध्ये भरवयाची असेल तेंव्हा ती एकदम वरून ओतू नये त्यामुळे तळाशी असणारे मशरुम्स तुटण्याची शक्यता असते. वाळू भरण्यासाठी वरच्या झाकणातून काही पुठ्ठा आत टाकावा आणि त्यावरून वाळू हळू हळू मध्ये टाकावी.
सॅण्ड फिल्टर मध्ये तीन वेगवेगळ्या आकारांच्या वाळूच्या कणांचे मिश्रण असते. हि वाळू साधी नसून विशिष्ठ प्रकारची असते. या वाळूच्या कणांना विशिष्ठ प्रकारची धार दिलेली असते. त्यामुळेसॅण्ड फिल्टर मध्ये वाळू पुन्हा भरतांना साधी नदीची वाळू अजिबात वापरू नये कारण, त्यामुळे सॅण्ड फिल्टरचे मुख्य कार्य नीट होणार नाही.
Leave a reply