पाणी हा शेतीमधील एक महत्वाचा विषय आहे. दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळी घटते आहे तसेच पाऊस हि अनियमित पडतो आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा सुरक्षितपणे व सुयोग्य असा वापर करणे गरजेचे झाले आहे. मग प्रश्न असा पडतो कि असे कोणते तंत्रज्ञान आहे ज्याने पाण्याची बचत होऊ शकेल. १९ व्या शतकात शेती सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती अस्तित्वात आल्या. ह्या पद्धतींचा अवलंब करून शेतकरी शेतीसाठी पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करू शकतात.
सूक्ष्म सिंचनाच्या पद्धतीमध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन. तुषार सिंचनामुळे पाण्याची ३५ ते ५५ टक्के बचत होते तर ठिबक सिंचनामुळे हीच बचत ६५ ते ७५ टक्क्यांपर्यंत होते. चला तर मग जाणून घेवूयात ठिबक सिंचन प्रणाली विषय…
ठिबक सिंचन म्हणजे काय?
पिकांच्या मुळाच्या कार्यक्षम कक्षेत मोजून थेंबा थेंबाने पाणी देण्याच्या पद्धतीस ठिबक सिंचन असे म्हणतात. ह्या प्रणालीत पाईपलाईन आणि प्लास्टिकच्या नळ्याच्या सहाय्याने पिकांच्या मुळाशी पाणी दिले जाते.
ठिबक सिंचन पद्धतीची वैशिष्ट्ये
१) पिकांच्या गरजेप्रमाणे मोजमाप करून व काटेकोरपणे पाणी देता येते.
२) पाणी कमीत कमी मात्रेत देता येते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो.
३) पिकास पाणी दररोज व एकदिवसाआड देता येते.
४) पानी पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेत देता येते.
५) पाणी पिकांना सारख्या प्रमाणात देता येते.
६) खते, औषधे, संजीवके ठिबक सिंचनाद्वारे देता येतात त्यामुळे त्यांचा अपव्यय टळतो.
७) पिकांच्या सान्निध्यातील सूक्ष्म हवामानाचा समतोल राखला जातो. तसेच मुळांच्या कार्यक्षेत्रात हवा व पाणी यांचे प्रमाण पोषक राखले जाते.
८) पिकांची वाढ जोमदार होते व पिके टवटवीत दिसतात.
९) हलक्या प्रकारच्या जमिनीत पिके घेता येतात.
१०) भरघोस व दर्जेदार उत्पन्न मिळते.
ठिबक सिंचन पद्धतीचे फायदे
१. ठिबक सिंचनाने गरजेनुसार पाणी दिल्याने झाडांच्या हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही. त्यामुळे त्यांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते.
२. ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते.
३. बचत झालेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्रात वापर करता येतो.
४. कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही.
५. दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते.
६. ठिबकने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते.
७. पाणी साठून राहत नाही.
८. पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते.
९. क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तरीही पिकांचे उत्पादन घेता येते.
१०. जमिनी खराब होत नाही.
११. चढ-उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात.
१२. कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पिके घेऊन उत्पादन काढता येते.
१३. ठिबकने द्रवरूप खते देता येतात. खताचा १००% वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते. खताचा अपव्यय टळतो. पिकांना सम प्रमाणात खाते देता येतात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो.
१४. जमिनीची धूप थांबते.
१५. निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे.
ठिबक सिंचन पद्धतीचे तोटे
१) ठिबक सिंचन पद्धत बसवितांना सुरुवातीचा भांडवली खर्च जास्त असतो.
२) इतर सर्व पाणी देण्याच्या पद्धतींपेक्षा व्यवस्थापनकुशलता जास्त असणे आवश्यक आहे. त्याकरिता तांत्रिक पद्धतीची माहीत असणारा प्रशिक्षित मजूर संच चालविण्याकरिता व त्याची निगा राखण्याकरिता असावा.
३) स्वच्छ व काडी-कचरा विरहीत पाणी ठिबक संचातून ओलीताकरिता वापरणे आवश्यक आहे.
४) प्रकाशाच्या उष्णतेमुळे कालांतराने नळ्या लवचिक होऊन खराब होऊ शकतात.
५) शेतीच्या आंतरमशागतीस काहीसा अडथळा होतो.
६) जनावरांच्या, उंदरांच्या, घुशींच्या वावराण्याने संचाच्या घटकांना इजा पोहचण्याचा संभव असतो.
ठिबक सिंचन पद्धतीच्या मर्यादा
१) सिंचन पद्धत कार्यरत ठेवण्यासाठी कायम कार्यतत्परता ठेवणे आवश्यक आहे.
२) क्षारयुक्त पाण्याचा वापर करता येत नाही केल्यास ड्रीपर्स चोक होण्याची शक्यता असते.
३) पिकांच्या मुळांची ठराविक क्षेत्रातच वाढ होते.
४) प्लास्टिकच्या नळ्यांची यांत्रिकी खराबी.
५) दाट पेरा असणाऱ्या पिकांना उदा : गहू, सोयाबीन इ. तसेच भातासारख्या पिकास हि पद्धत वापरता येत नाही.
ठिबक सिंचन पद्धतीचे प्रकार
ठिबक सिंचनाचे मुख्यत्वे खालील प्रकार पडतात
१) भूपृष्ठावरील ठिबक सिंचन ( ऑनलाईन)
२) भूमिगत ठिबक सिंचन
३) धार स्वरुपात ठिबक सिंचन ( बबलर सिस्टीम )
४) सलग पट्टा ठिबक सिंचन
५) इनलाईन ड्रीपर ठिबक सिंचन.
१) भूपृष्ठावरील ठिबक सिंचन ( ऑनलाईन ) :-
या पद्धतीमध्ये पिकांच्या किंवा फळझाडांच्या ओळींनुसार लॅटरल ( वितरिका ) जमिनीच्या पृष्ठभागावर पसरल्या जातात. फळझाडांमधील अंतर पाहून प्रत्येक झाडाची पाण्याची गरज काढून लॅटरलवर बसवायच्या ड्रीपर्सची ( तोट्या ) संख्या ठरविली जाते.
या प्रकाराचा वापर मुख्यत्वे जास्त अंतराच्या फळबागांसाठी / पिकांसाठी केला जातो. कमी अंतराच्या पिकांसाठी वापरल्यास भांडवली खर्च जास्त येतो. या पद्धतीमध्ये ड्रीपरमधून पडणाऱ्या पाण्याचा वेग दर ताशी ४ ते १६ लिटरच्या दरम्यान असतो.
या पद्धतीमध्ये ड्रीपर बंद पडल्यास साफ करणे, अधून मधून पाहणी करणे आणि जमिनीवर पाणी किती पसरते याचा अंदाज घेणे इत्यादी फायदे आहेत.
२) भूमिगत ठिबक सिंचन
या पद्धतीमध्ये मुख्यतः इनलाईन ड्रीपर टाकलेल्या लॅटरल जमिनीमध्ये १० ते १५ से.मी खोलीपर्यंत गाडतात. या पद्धतीमध्ये पाणी हे जमिनीच्या पृष्ठ्भाखाली दिले जाते. त्यामुळे बाष्पीभवनाचा ऱ्हास कमी होतो व मुळांचा फक्त कार्यक्षम थरच भिजविला जातो. या पद्धतीमध्ये पिकांची मुळे काही वेळा ड्रीपर्सच्या मध्ये गेलेली आढळून आलेले आहे. त्यामुळे हि तितकी प्रचलित नाही.
३) धार स्वरुपात ठिबक सिंचन ( बबलर सिस्टीम )
काही फळझाडांच्या मुळांची रचना भिन्न स्वरुपाची असते. त्यासाठी ठिबक पद्धतीने पाणी देण्याच्या पद्धतीत थोडा बदल करून थेंब थेंब पाणी देण्याऐवजी बारीक धारेच्या स्वरुपात पिकांच्या किंवा झाडांच्या बुध्याजवळ आळ्यामध्ये देता येते. या पद्धतीमध्ये पाणी लॅटरलला दुसरी लहान व्यासाची नळी ( मायक्रोट्युब ) पाणी झाडांच्या बुध्याजवळ आळ्यामध्ये देतात.
झाडाजवळ पाणी सोडण्याचा वेग सुमारे २२५ लिटर्स प्रती तास किंवा त्यापेक्षा कमी असू शकतो. या पद्धतीमध्ये पाणी देण्याचा वेग हा जमिनीत पाणी जीरण्याच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे पाणी साचून राहते, त्यासाठी छोटे आळे करणे आवश्यक आहे. काही वेळाने जमीन संतृप्त होते, पूर्ण हवा बाहेर फेकली जाते व काही प्रमाणात मुळांवर हवेचा ताण पडतो. या पद्धतीचा खर्च कमी, देखभाल सोपी आणि वापरण्यास चांगली व सुटसुटीत असे फायदे आहेत.
४) सलग पट्टा ठिबक सिंचन
या पद्धतीमध्ये पिकांच्या दोन ओळींसाठी एक लॅटरल वापरली जाते आणि लॅटरलवर ठरविक अंतरावर तोट्या बसविल्या जातात किंवा इनलाईन ड्रीपरचा वापर केला जातो. त्यानंतर लॅटरल ह्या जमिनीखाली गाडल्या जातात.
पाणी कमी वेगाने कायम जमिनीच्या पोटात कार्यक्षम मुळांच्या थरात सोडले जाते. या पद्धतीमुळे जमिनीच्या प्रकारानुसार ठराविक रुंदीची पट्टी ओळी राहते. इतर पद्धतींपेक्षा या पद्ध्तीमध्ये खर्च कमी येतो.
५) इनलाईन ड्रीपर ठिबक सिंचन
इनलाईन पद्धतीमध्ये ड्रीपर हा लॅटरल तयार करताना लॅटरलच्या आत ठराविक अंतरावर जोडला जातो. या मध्ये दोन ड्रीपरमधील अंतर हे ३०, ४५, ६०, ७५, ९० से.मी इतके असते व ड्रीपरचा प्रवाह हा २ किंवा ४ लिटर प्रती तास इतका असतो.
इनलाईन पद्धतीमध्ये ड्रीपरमधील अंतर व ड्रीपरचा प्रवाह निवडतांना पिकाची पाण्याची गरज व जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता विचारात घ्यावी लागते. या पद्धतीमध्ये ठिबक संच एकदा बसविल्यानंतर दोन ड्रीपरमधील अंतर बदलता येत नाही.
ऊसासारख्या पिकांना तसेच भाजीपाला, फुलशेती, स्ट्रॉबेरी इ. पट्टा पद्धतीत लावल्या जाणाऱ्या पिकांना हि पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. इनलाईन पद्धतीमध्ये उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतानुसार वाळूचा किंवा शंकू फिल्टर वापरणे गरजेचे आहे.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव ( महाराष्ट्र ) हि ठिबक सिंचन क्षेत्रात नावाजलेली कंपनी असून संपूर्ण भारतभर आपले उच्च दर्जाचे ठिबक वितरीत करते. हिरा ठिबक खरेदी करण्यासाठी आजच आमच्या संकेतस्थळाला भेट द्या www.heeraagro.com येथे.
Leave a reply