सूक्ष्म सिंचन पद्धतीत वरदान म्हणून पुढे आलेल्या ठिबक सिंचन या पद्धतीचा अवलंब करताना आर्थिक गणित बिघडू नये या साठी ठिबक संचाची योग्य देखभाल करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन संचातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे “ ड्रिपर्स ”. ज्यामधून पाणी थेंबाथेंबाने पिकांना/ झाडांना दिले जाते. यासाठी ठिबक संच चालू असतांना शेतामध्ये फिरून ड्रिपर्स मधून ठराविक दराने पाणी दिले जात आहे की नाही ते तपासणे. ज्या ठिकाणी मुळांच्या कार्यक्षम कक्षेत पाणी पोहचत नसेल तेथील ड्रिपर्स साफ करणे किंवा बदलणे. ड्रिपर्स चा प्रवाह ठराविक दाबावर अपेक्षित प्रवाहापेक्षा कमी आढळून आल्यास ड्रिपर्स उघडून स्वच्छ करावेत.
ड्रिपर्स ची छिद्रे पाण्यातील जीवाणू, केर-कचरा, सूक्ष्म जीवतंतू व शेवाळामुळे बंद पडू नयेत या करिता १५ दिवसांच्या अंतराने क्लोरीन प्रक्रिया करावी. पाण्यामध्ये कमी अधिक प्रमाणात क्षार असतात. कधी कधी पाण्यामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण (७५ मि.ग्रॅ / लिटर पेक्षा जास्त ) असल्यास ठिबक संच बंद असतांना ड्रिपर्स वरील पाण्याचे बाष्पीभवन होऊन कॅल्शियम कार्बोनेटचा थर तयार होतो आणि त्यामुळे ड्रिपर्स बंद होतात. ड्रिपर्स ची छिद्रे पाण्यातील क्षारांमुळे ( लॅटरल व ड्रीप मध्ये साचलेले क्षार जसे कॅल्शिअम कार्बोनेट, मॅग्नेशिअम कार्बोनेट, किंवा फेरीक ऑक्साइड ) पडू नयेत या करिता १५ दिवस किंवा एका महिन्याच्या अंतराने आम्ल प्रक्रिया करावी. क्लोरीन व आम्ल प्रक्रिया एकाच वेळीस करू नये.
मागील लेखात आपण ड्रिप चोकप का होते ? ह्याची कारणभिमांसा अभ्यासली ह्या लेखी आपण पाहणार आहोत कि ड्रिप चोकप झाल्यास काय उपाययोजना कराव्यात.
ड्रिपर्सचे चोकप काढण्यासाठी दोन प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करतात त्या खालील प्रमाणे
१) आम्ल प्रक्रिया : आम्ल प्रक्रिया करण्यासाठी आपण खालील पैकी कोणतेही एक आम्ल वापरू शकतो.
अ) हायड्रोक्लोरिक आम्ल (३६%) ब) सल्फ्युरिक आम्ल ( ६५%)
क) नायट्रिक आम्ल (६०%) ड) फोस्फोरीक आम्ल ( ८५%)
२) क्लोरीन प्रक्रिया : क्लोरीन प्रक्रियेसाठी क्लोरीन गॅस, सोडियम हायपोक्लोराइड , कॅल्शियम हायपोक्लोराइड किंवा ब्लीचिंग पावडरचा वापर करतात.
आम्ल द्रावण तयार करण्याची पध्दती
- एका प्लॅस्टिक च्या बादलीमध्ये एक लिटर पाणी घेऊन, त्यात आम्ल (अॅसिड) मिसळत जावे.
- आम्ल मिसळताना मधेमध्ये पाण्याचा सामू पीएच मीटरने अथवा लिटमस पेपरने मोजावा.
- पाण्याचा सामू ३ ते ४ होईपर्यंत (लिटमस पेपर चा रंग फिकट गुलाबी होईपर्यंत) पाण्यात आम्ल मिसळत जावे.
- पाण्याचा सामू ३ ते ४ करण्यासाठी किती आम्ल लागले ते लिहून ठेवावे.
- पंप चालू केल्यानंतर संचाच्या शेवटच्या ड्रीपर पर्यंत पाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो याची नोंद घ्यावी. साधारणत: १५ मिनिटे वेळ लागतो असे गृहीत धरू.
- संचातून पाणी वाहण्याचा दर लक्षात घेऊन १५ मिनिटात त्या संचातून किती पाण्याचा विसर्ग होणार आहे, त्याचा हिशेब करून त्यासाठी लागणारे आम्लाचे प्रमाण काढावे. त्यासाठीचे सूत्र खालीलप्रमाणे:
एकूण १५ मिनिटात संचातून सोडायचे आम्ल (लिटर)= १५ मिनिटात संचातून होणारा पाण्याचा विसर्ग (लिटर) X १ लिटर पाण्याचा सामू ३ होण्यासाठी लागणारे आम्ल (लिटर)
आम्ल प्रक्रिया करण्याची पध्दती
- आम्ल प्रक्रिया करण्यापूर्वी, अंशत: किंवा बंद पडलेले ड्रीपर्स (तोट्या) खूण करून ठेवावे. तसेच फिल्टर, मेन आणि सबमेन लाईन फ्लश करून घ्यावे.
- ठिबक सिंचन संच सामान्य दाबाने चालू ठेवावा व वरील सूत्राप्रमाणे मिळवलेले आम्लाचे द्रावण तयार करून घ्यावे.
- पाण्याचा संचामधून किती प्रवाह चालू आहे, ते तपासून पाहून त्यानुसार प्रवाह निश्चित करावा.
- व्हेंच्युरी किंवा फर्टीलायझर इंजेक्शन पंपाच्या सहाय्याने योग्य प्रमाणात आम्लाचे द्रावण सिंचन प्रणालीमध्ये सोडायला सुरुवात करावी. या वेळी आम्लाच्या द्रावणाचा दर व पूर्ण प्रवाहाचा सामू ३ राहील अशा प्रकारे निश्चित करावा.
- आम्ल द्रावण साधारणत: १५ मिनिटे संचातून सोडावे व व्हेंच्युरी किंवा फर्टीलायझर इंजेक्शन पंप बंद करावे.
- ही प्रक्रिया झाल्यानंतर संच २४ तास बंद ठेवावा. नंतर संपूर्ण ठिबक सिंचन संच १५ ते २० मिनिटे चालवून फ्लश करावा.
- आधी खूण करून ठेवलेले ड्रीपर्स (तोट्या) मधून पाणी पूर्ण क्षमतेने पडत आहे किंवा नाही हे तपासून पहावे, नसल्यास परत आम्ल प्रक्रिया करावी.
क्लोरीन प्रक्रिया (क्लोरिनेशन)
ठिबक संचातील पाईप, लॅटरल, ड्रीपर्स यामध्ये झालेल्या शेवाळ वाढीमुळे संचाची कार्यक्षमता मंदावते. ठिबक सिंचन संचामध्ये जैविक व सेंद्रिय पदार्थाची झालेली वाढ रोखण्यासाठी क्लोरीन प्रक्रियेचा उपयोग होतो. यासाठी ब्लिचिंग पावडर (कॅल्शिअम हायपोक्लोराईट) चा उपयोग करावा, त्यामध्ये ६५ टक्के मुक्त क्लोरीन असतो. अथवा सोडीअम हायपोक्लोराईट वापरावे, त्यामध्ये १५ टक्के मुक्त क्लोरीन असतो. ब्लिचिंग पावडर हा सर्वात स्वस्त व सहज बाजारात उपलब्ध होणारा क्लोरीन चा स्रोत आहे. परंतु, सिंचनाच्या पाण्यामध्ये कॅल्शिअम चे प्रमाण (२० पीपीएम पेक्षा जास्त) जास्त असल्यास ब्लिचिंग पावडर वापरू नये. आम्ल प्रक्रियेची गरज असल्यास टी क्लोरीन प्रक्रियेपूर्वीच करून घ्यावी, कारण बाहेर पडणारा क्लोरीन वायू विषारी असतो. क्लोरीन प्रक्रिया खालीलप्रमाणे करावी:
- ठिबक सिंचन संचाच्या विसर्ग दराप्रमाणे पूर्ण संचातून २० ते ३० पीपीएम क्लोरीन जाईल एवढे क्लोरीन द्रावण संचात सोडून संच २४ तास बंद ठेवावा.
- क्लोरीन चे द्रावणातील प्रमाण मोजण्यासाठी क्लोरीन पेपर चा उपयोग करावा.
- नंतर संपूर्ण ठिबक संच फ्लश करून घ्यावा.
हे प्रकार झाले फर्टिगेशन यंत्रणेचा वापर करून रासायनिक प्रक्रिया करण्याचे या शिवाय खालील पद्धतीने सुद्धा काही शेतकरी चोकप झालेल्या ड्रिप नळ्या साफ करतात.
१) एक टाकीमध्ये पाणी घेऊन त्यात आम्ल मिसळावे व योग्य प्रमाणाचे द्रावण तयार करावे आणि त्यात ठिबकच्या नळ्या टाकाव्यात. म्हणजे चोकप झालेले ड्रिपर्स साफ होतात.
२) एक बांगडी / एचडीपीइ पाईप घ्या तो गोल वाकून थोडा जमिनीत गाडा. गाडलेल्या भागात आम्लयुक्त पाणी टाका / भरा. पाईपच्या एका बाजूने ठिबकच्या नळ्या आत सोडा व दुसऱ्या टोकातून बाहेर काढा. ह्यामुळे साचलेले क्षार किंवा घन साफ होऊन चोकप निघेल.
ठिबक सिंचन चोकप कसे काढावे हे व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेण्याकरिता खालील व्हिडीओ नक्की पहा
शेतीविषयक प्रतिपूर्ण माहिती मिळवण्यासाठीहिरा ऍग्रोच्या युट्युब चॅनेलला एकदा नक्की भेट द्या.
Leave a reply