ठिबकसाठी कोणते फिल्टर वापरावे?
सूक्ष्म सिंचन प्रणालीत सर्वात प्रभावशाली तंत्र म्हणजे ठिबक सिंचन. या तंत्राद्वारे पाणी पिकांच्या मुळांच्या कार्यक्षम कक्षेत मोजून मापून थेंबा थेंबाने दिले जाते. या तंत्रात उपलब्ध पाण्याची गुणवत्ता हा एक महत्वाचा विषय आहे. कारण, पिकांना दिले जाणारे पाणी नदी, नाला, शेततळे, बोअरवेल इ. विविध स्त्रोतांपासून शेतापर्यंत येते. ह्या स्त्रोतांपासून पाणी येताना त्यात शेवाळ, वाळू, केर-कचरा अशी घाण येऊ शकते. ज्यामुळे ठिबक संचात हि घाण जाऊन संपूर्ण संचच बंद पडण्याची दाट शक्यता आहे. ह्यावर उपाय म्हणजे “गाळण यंत्रणा ( फिल्टर्स )”. फिल्टर्स हे ठिबक संचाचा अविभाज्य व आवश्यक घटक आहे.
फिल्टरचे प्रमुख प्रकार :
प्रामुख्याने फिल्टर्स चे दोन प्रकार पडतात.
१) प्रायमरी फिल्टर्स
२) सेकंडरी फिल्टर्स
१) प्रायमरी फिल्टर्स :- ह्याचे दोन प्रकार आहेत.
अ) वाळूची गाळण यंत्रणा ( सँड फिल्टर ) ब) शंकू फिल्टर
२) सेकंडरी फिल्टर्स :- ह्याचे दोन प्रकार आहेत.
अ) जाळीची गाळण यंत्रणा (स्क्रिन फिल्टर) ब) चकतीची गाळण यंत्रणा (डिस्क फिल्टर)
कोणते फिल्टर केव्हा वापरावे?
१) शास्त्रोक्त नियम असा आहे की जिथे सेकंडरी फिल्टर वापरला आहे तिथे प्रायमरी फिल्टर नसला तरी काम भागेल पण जिथे प्रायमरी फिल्टर वापरला आहे तिथे सेकंडरी फिल्टर आवश्य वापरलाच पाहिजे.
२) जेथे उघड्या पाण्याचा स्त्रोत आहे उदा :- नदी, नाला, शेततळे इ. तेथे शेवाळ निर्मिती जास्त प्रमाणात होते. तसेच मोठ्या प्रमाणात केर-कचरा वाऱ्याने उडत येऊन पाण्यात साचतो. हे शेवाळ, कचरा मोठ्या प्रमाणात पाण्यात मिसळून शेतापर्यंत येते. ह्यामुळे स्क्रिन फिल्टरची जाळी चोक अप होऊ शकते. परिणामी ठीबकच्या नळ्या व ड्रीपर्स चोक होऊन संपूर्ण ठिबक संचच बंद होण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत सँड फिल्टर वापरणे गरजेचे आहे.
३) सँड फिल्टर मोठ्या प्रमाणात पाण्यासोबत आलेली घाण शेवाळ, केर-कचरा छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतरीत करते व पाणी पुढे पाठविते. नंतर सेकंडरी फिल्टर ( स्क्रिन किंवा डिस्क फिल्टर ) उरलेला कचरा पाण्यातून काढून टाकून स्वच्छ पाणी ठिबक संचास पुरविते.
४) ज्या ठिकाणी पाण्याच्या स्त्रोतात रेती असते तिथे मोठ्या प्रमाणात वाळूचे कण पाण्यासोबत वाहत येतात. अश्यावेळेस ह्या वाळूच्या कणांमुळे ठिबक नळ्या व ड्रीपर्स चोक होऊन संच बंद पडू शकतो. म्हणून ह्या कणांपासून ठिबक संचाचे रक्षण व्हावे यासाठी शंकू फिल्टर वापरावा व नंतर सेकंडरी फिल्टर म्हणून स्क्रिन किंवा डिस्क फिल्टर वापरावे.
५) जेथे शेवाळ व रेती हे दोन्ही पाण्यामध्ये मोठ्या आढळतात तेथे सँड फिल्टर व शंकू फिल्टर दोन्ही वापरावे. अश्या वेळी शंकू फिल्टर आधी व सँड फिल्टर नंतर वापरावा. कारण, बारीक रेतीचे कण सॅंड फिल्टरच्या वाळूत मिसळून त्यातील कार्यक्षम सँड ( वाळू ) खराब करू शकते. त्यामुळे सँड फिल्टरचे कार्य बंद होऊन पुढील स्क्रिन फिल्टर मध्ये वाळू जाईल व स्क्रिन फिल्टरची जाळी चोक अप होऊन ते वारंवार बंद पडू शकते. म्हणून आधी शंकू मग सँड व नंतर स्क्रिन किंवा डिस्क फिल्टर अशी मांडणी असावी.
६) स्क्रिन फिल्टरच का जास्त प्रमाणात वापरले जाते ? कारण, ते डिस्क फिल्टर पेक्षा स्वस्त असते व त्याला कमी देखभालीची गरज असते. पण, स्क्रिन फिल्टरमध्ये एकच जाळी असते व डिस्क फिल्टरमध्ये आलेले पाणी अनेक अडथळ्यांमधून पार होते जिथे पाण्यातील घाण अधिक कार्यक्षमतेने पाण्यातून काढली जाते. स्क्रिन फिल्टरमधील जाळी फर्टीगेशन द्वारा दिल्या जाणाऱ्या रसायनांच्या प्रभावामुळे गंजू शकते व खराब होऊ शकते. पण डिस्क फिल्टरमधील चकत्या प्लास्टिकच्या असल्यामुळे हा प्रश्नच उद्भवणार नाही. म्हणून डिस्क फिल्टर अधिक कार्यक्षम आहे.
फिल्टर्सची कार्यपद्धती :
१) पाण्यात तरंगणारी सर्व प्रकारची घाण हि मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर येते. त्यामुळे स्क्रिन फिल्टर वारंवार चोक अप होईल. म्हणून सँड फिल्टर वापरण्यात यावे.
२) मोठ्या प्रमाणात येणारी हि घाण सॅंड फिल्टर मध्ये जमा झाली की फिल्टर मधील कार्यक्षम व विशिष्ठ प्रकारे धार दिल्या गेलेली वाळू (सँड) ह्या घाणीचे छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतर करून पाणी आउटलेट द्वारे पुढे पाठविते. आता हि छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतरीत झालेली घाण पाण्यासोबत पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणून ती आडविण्यासाठी संचाच्या मांडणीमध्ये स्क्रिन फिल्टरची किंवा डिस्क फिल्टरची आवश्यकता आहे.
३) जेंव्हा पाण्याचा स्त्रोत नदी असतो किंवा नदीकाठच्या जमिनीतील विहीर / बोअर असतो. तेंव्हा रेतीचे बारीक कण ( रेताड ) मोठ्या प्रमाणात पाण्यासोबत येतात ज्यामुळे स्क्रिन फिल्टर थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने चोक अप होऊ शकते. अश्या परिस्थितीत शंकू फिल्टर कामास येईल. म्हणून संचाच्या मांडणीत शंकू फिल्टर व नंतर सेकंडरी फिल्टर असावा.
४) आकार शंकूसारखा म्हणून याला शंकू फिल्टर असे म्हणतात. यात एका खाली एक अश्या चकत्या असतात. पाणी इनलेट मधून आत येते व ह्या चकत्यांमधून वेगाने गोल-गोल फिरविले जाते. त्यामुळे पाण्यातील जड कण खालच्या बाजूस कलेक्शन टॅंकमध्ये जमा होतात व कणविरहीत पाणी आउटलेटद्वारे पुढे पाठविले जाते. कलेक्शन टॅंकला असलेल्या झडपेतून हे जमा झालेले वाळूचे कण काढता येतात. यात पाण्यासोबत शेवाळ आले तर तेही पाण्यासोबत बारीक तुकड्यांत पुढे जाईल म्हणून जोडणीत सेकंडरी फिल्टर लावणे जरुरी आहे.
५) फिल्टर्स नेहमी उच्च क्षमतेचेच लावावेत.
६) बऱ्याच वेळेस अशी शंका येते की फिल्टर्स मुळे पाण्याच्या दाबावर काही परिणाम होत असेल ? तर, सेकंडरी फिल्टरची जाळी चोक अप असल्यास मागील पाण्याचा दबाव वाढेल नाही तर पाणी पुढे जात राहील. अधून-मधून फिल्टरची जाळी साफ करीत जावी म्हणजे हा प्रश्न उद्भवणार नाही.
७) सँड फिल्टरमध्ये तीन वेगवेगळ्या आकारांची वाळू एकत्र स्वरुपात असते. ह्यात घाण जमा होऊन ते अकार्यक्षम होऊ नये यासाठी इनलेट, आउटलेट व बॅकफ्लश बंद करून फ्लश उघडावा व त्यातून वेगाने पाणी आत सोडावे त्यामुळे वाळूत अडकलेली घाण स्वच्छ होऊन फ्लशवाटे निघून जाईल. कालांतराने जास्त प्रमाणात घाण जमा झाल्यास फिल्टरवर दिलेले चार नट उघडून वाळू काढून घ्यावी आणि अॅसिडयुक्त पाण्याने धुवून परत फिल्टरमध्ये भरावी.
ठिबक सिंचन फिल्टरची देखभाल कशी करावी याविषयीचा ब्लॉग देखील तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव हि सिंचन क्षेत्रातील नावाजलेली कंपनी असून उत्कृष्ट दर्जाचे सिचन साहित्य निर्मिती आणि विक्री चा व्यवसाय करते. आमच्याकडे ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व प्रकरचे फिल्टर्स माफक दारात उपलब्ध आहेत. आमच्या फिल्टर्स विषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा – https://heeraagro.com/mr/product-category/filter-mr/
योग्य फिल्टर निवडण्यासाठी तुम्हाला अडचण येत असल्यास कृपया मोबाईल नंबर नोंदवून Connect वर क्लिक करा.
[ninja_form id=3]
Leave a reply